गुजरातमध्ये पुन्हा मजुरांचा उद्रेक, रस्त्यावर उतरून तोडफोड

1066

गुजरातमध्ये पुन्हा मजुरांनी घरी जाण्यासाठी आंदोलन करत तोडफोड केली आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये ही घटना घडली असून 500 हून अधिक मजूर आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. परंतु जाण्यासाठी कुठल्याही वाहनाची व्यवस्था नव्हती. त्यानंतर चिडलेल्या मजुरांनी तोडफोड सुरू केली. यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

गुजरातच्या राजकोटमध्ये शापर-वेरावल महामार्गावर रविवारी मजुरांनी तोडफोड केली. या हिंसेत खासगी गाड्यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच पोलीस अधिक्षक बलराम मीणा जखमी झाले आहे तसेच काही पोलीस कर्मचारी आणि पत्रकारही जखमी झाले आहेत. नंतर मजुरांची समजूत काढत त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर मजूर शांत झाले. गुजरातमध्ये आतापर्यंत चारवेळा मजुरांनी अशा प्रकारे आंदोलन केले आहे. लॉकडाऊन जारी झाल्यानंतर त्यांच्या हातात काम उरले नाही, तसेच घरी जाण्यासाठी कुठलेच वाहन नसल्याने मजुरांमध्ये असंतोष आहे.

हरयाणामध्येही मजुरांनी आंदोलन केले आहे. हरयाणाच्या यमुनानगर महामार्गावर मजुरांनी अंदोलन केले. तर उत्तर प्रदेशमध्ये कानपूर-लखनौ महामार्गावर आंदोलन केले आहे. दिल्लीतही उत्तर प्रदेश सीमेवर मजूर मोठ्या संख्येने जमा झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या