गिरणी कामगारांचा २८ ऑगस्टला मंत्रालयावर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता गिरणी कामगार कृती समितीच्या वतीने मंत्रालयावर कामगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

आतापर्यंत १ लाख ७५ हजार कामगारांपैकी फक्त ११ हजार ९७६ कामगारांना सोडतीत घरे मिळाली आहेत. बाकीच्या कामगारांच्या घरांचा प्रश्न अजूनही सोडवला गेलेला नाही. पनवेलमध्ये एमएमआरडीएची आठ हजार तर मुंबईत बॉम्बे डाइंग, श्रीनिवास या गिरण्यांच्या जागेवर पाच हजार घरे बांधून तयार आहेत, मात्र त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न स्वतंत्र मंत्री नेमून किंवा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमून सोडवण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र त्याबाबत आतापर्यंत कोणतेही सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. रयतराज संघटना, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, गिरणी कामगार संघर्ष समिती आणि सेंच्युरी मिल कामगार एकता मंच या पाच संघटना यात सहभागी होणार आहेत, असे गिरणी कामगार कृती संघटनेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.