
म्हाडाने काढलेल्या लॉटरीमध्ये आज हजारो गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही घरे केवळ साडेनऊ लाख रुपयांमध्ये मिळणार असल्याने विजेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुंबईत आपले हक्काचे घर झाल्याची गोड बातमी सगेसोयरे, मित्रमंडळींना कळवण्यात कामगार दंग झाले होते. एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा देत होते. त्यामुळे वांद्रे येथील म्हाडा कार्यालय परिसरातील वातावरण आनंदाने फुलून गेले होते.
गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार याआधी तीन टप्प्यांत 11 हजार 976 घरे लॉटरीच्या माध्यमातून गिरणी कामगारांना दिली असून आज चौथ्या टप्प्यात 3 हजार 894 घरांची पारदर्शकपणे लॉटरी काढली आहे. आयुष्यभर ज्या गिरणीत काम केले त्याच ठिकाणी आपल्याला हक्काचे घर मिळणार असल्याने सकाळपासून कामगारांनी म्हाडा परिसरात मोठी गर्दी केली होती. ऑनलाइन लॉटरीचे निकाल समोर येताच विजेत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच अनेक वर्षे दिलेला लढा कामी आला, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
गृहस्वप्न पूर्ण
आयुष्यभर ज्या गिरणीमध्ये काम केले तेथेच हक्काचे घर मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे, असे बॉम्बे डाईंग मिलमध्ये काम केलेल्या सुभाष सावंत यांनी सांगितले. सध्या आम्ही ठाण्याला राहतो, लवकरच स्वतःच्या घरात शिफ्ट होऊ.
आता मोकळा श्वास मिळेल
1992 पासून बॉम्बे डाईंग प्रिंग मिलमध्ये काम करतोय. पण हातात येणारा पगार बेताचा असल्याने आईच्या नावावर असलेल्या दादर-नायगाव येथील 185 चौरस फुटाच्या खोलीत माझे आणि भावाचे कुटुंब कसबसे दिवस काढत होते. पण आता मला हक्काचे 225 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे. आमच्या कुटुंबाला आता मोकळा श्वास घेता येईल, अशी प्रतिक्रिया संतोष राजाराम मोरे यांनी व्यक्त केली.
घर मिळालंय यावर विश्वासच बसेना
बॉम्बे डाईंग मिलमध्ये मी दहा वर्षे नोकरी केली आहे. येथे माझे वडील, दोन भाऊ, तीन चुलते कामाला होते. माझ्यापेक्षा त्यांनी जास्त काळ काम केले आहे. पण म्हाडाने काढलेल्या लॉटरीत मी नशीबवान ठरलो आहे. पण मला घर लागलंय यावर विश्वासच बसत नसल्याची प्रतिक्रिया समीर मकबूल हवलदार यांनी दिली. आता नक्कीच हक्काच्या घरात आनंदाने जाईन असेही ते म्हणाले.
आनंद गगनात मावेना
म्हाडाने काढलेल्या लॉटरीत घर लागेल आणि आपण हक्काच्या घरात जाऊ असे कधी वाटलेच नव्हते. पण आज माझे नशीब उघडल्याची प्रतिक्रिया अनिता अनंत मालवणकर यांनी दिली. वर्षानुवर्षे वाकोला येथील 10 बाय 10 चौरस फुटांच्या खोलीत राहत असल्याने आपल्या हक्काचे घर असावे असे स्वप्न होते ते आज सत्यात उतरल्याने आनंद झाला असल्याचे अनिता यांनी सांगितले. त्यांना श्रीनिवास मिलमध्ये घर मिळाले आहे.






























































