
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी 25 एकर जमीन हडपल्याचे उघडकीस आले आहे. आदिवासी समाजाची पहिली सूतगिरणी स्थापन करण्यासाठी आदिवासी बांधवाचीच जमीन जबरदस्तीने मंत्री अशोक उईके यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे.
यवतमाळ जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱया अॅड. सीमा तेलंगे यांनी नागपूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत मंत्री उईके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आदिवासी विकास मंत्री उईके हे ‘भूमाफिया’ असून राळेगाव तालुक्यातील दवेधरी येथील भुरबा कोवे हा शेतकरी 1951पासून कुळानुसार वहिवाट करत असलेली 25 एकर जमीन आदिवासी समाजाच्या सूतगिरणीच्या नावाखाली त्यांनी लाटली. या कुटुंबाला जमिनीवरील हक्क सोडण्यासाठी आजही धमक्या दिल्या जात असल्याचे अॅड. तेलंगे यांनी म्हटले आहे.
प्रकरण काय…
राळेगाव तालुक्यातील देवधरी या गावात मधुसूदन देशमुख यांची 25 एकर जमीन होती. ही जमीन वहिवाटीने भुरबा कोवे या आदिवासी शेतकऱयाला मिळाली. 1950पासून ही जमीन कोवे यांच्या ताब्यात होती. सातबारावर कोवे यांचे नाव होते. परंतु अशोक उईके यांनी 2020मध्ये मूळ जमीन असलेल्या देशमुख यांच्या वारसांकडून ती खरेदी केली व तलाठय़ाशी संगनमत करून डिजिटल सातबारावरून कोवे यांचे नाव हटविले. कोवे यांच्या शेतात जेसीबी टाकून पीक उद्ध्वस्त केले.
मुलीला सरकारी वकील केले
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मुख्यमंत्र्यांकडून विशेषाधिकार वापरून मुलगी अॅड. प्रियदर्शनी उईके यांना मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळवून दिली, असा गंभीर आरोप तेलंगे यांनी केला. मंत्री उईके यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी नागपूर येथे संविधान चौकात आदिवासी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते, याकडेही सीमा तेलंगे यांनी लक्ष वेधले.
प्रकरण न्यायप्रविष्ट – अशोक उईके
‘सूतगिरणीच्या जमिनीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. अॅड. तेलंगे स्वतः वकील असूनही त्यांना या गोष्टी कळत नसेल तर कठीण आहे, असे सांगत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आरोप फेटळाळे. तेलंगे यांचा बोलविता धनी राळेगाव तालुक्यातील एक माजी मंत्री असल्याचे उईके म्हणाले.





























































