
सामना प्रतिनिधी । नागपूर
आधी घर, मूल आणि कुटुंब सांभाळा, मग देश असा कानमंत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज विद्यार्थ्यांना दिला. मात्र गडकरींचा हा नवा सल्ला नेमका कुणासाठी याचीच खुमासदार चर्चा सुरू होती.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात ‘तू माझा सांगाती’ हा कार्यक्रम ओ पॉझिटिव्ह फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. अभाविपच्या विद्यार्थ्यांना गुरुमंत्र देताना गडकरी म्हणाले, मला अनेक लोक भेटतात, जे भाजपसाठी आणि देशासाठी जीवन देण्याचे मोठमोठे दावे करतात, मात्र मी त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारतो आणि म्हणतो, पहिले तुमचे कुटुंब सांभाळा आणि त्यानंतर भाजप आणि देशाचे कार्य करा.
जर संघटना चालवायची असेल तर प्रथम कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे. असे व्हायला नको की कार्यकर्ता राबतोय म्हणून त्याला कितीही राबवून घ्यावे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी राजकारणात किंवा संघटनेच्या कार्यात स्वतःला झोकून देताना कुटुंबाचा विचार केला पाहिजे असे गडकरी म्हणाले.

























































