
पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा हिंदुस्थानच्या कृषी क्षेत्रावर किंवा शेतकऱ्यांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी म्हटले आहे. आगामी खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे आणि खतांचा साठा देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघर्षाचा पुरवठा साखळीवर परिणाम होणार नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव मनविंदर कौर द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, जागतिक परिस्थितीचा विचार करून मंत्रालयाने खरीप हंगामासाठीच्या आवश्यक साहित्याचा सविस्तर आढावा घेतला आहे. या हंगामासाठी देशात १८५.७४ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून, अपेक्षित गरज १६6.४६ लाख क्विंटल इतकी आहे. म्हणजेच गरजेपेक्षा सुमारे १९.२९ लाख क्विंटल बियाणे अधिक उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, मका आणि कडधान्ये अशा सर्व प्रमुख पिकांच्या बियाण्यांचा समावेश असून, देश सध्या सुखद स्थितीत आहे. रब्बी हंगामासाठीच्या बियाण्यांबाबतही सरकारकडे पुरेसा साठा असल्याचे त्यांनी सांगितले.
खतांच्या उपलब्धतेबाबत माहिती देताना द्विवेदी यांनी सांगितले की, खरीप पिकांसाठी ३९०.५२ लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता भासणार आहे. यापैकी ४६ टक्के म्हणजेच १८० लाख मेट्रिक टन खते ओपनिंग स्टॉक म्हणून आधीच उपलब्ध आहेत. नियमानुसार गरजेच्या एक तृतीयांश साठा उपलब्ध असणे पुरेसे मानले जाते, मात्र हिंदुस्थानकडे त्यापेक्षाही अधिक साठा आहे. याव्यतिरिक्त २.५ लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त कीटकनाशके उपलब्ध असून, ही संख्या आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त आहे.


























































