मेंढपाळ कुटुंबातील 15 वर्षीय मुलाचे अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, येवला

लहित येथील प्रकाश सुदाम मोरे (वय 15) याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याचे वडील सुदाम चिंधा मोरे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. लहित येथील मजुरीकाम करणारे सुदाम चिंधा मोरे यांचा मुलगा प्रकाश हा ममदापुर (ता. येवला) येथील त्यांच्या ओळखीचे गृहस्थ दशरथ मुरलीधर शिंदे यांच्याकडे मेंढपाळी करण्यासाठी गेला होता. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रकाश हा सकाळी येवला शहर लगत असलेल्या नागडे शिवारात मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी घेऊन गेला तो परत आलाच नाही.

बरेच दिवस त्याचा शोध घेतला असता त्याचा तपास लागला नाही. प्रकाशचे वडील सुदाम मोरे यांना प्रकाशला कोणी तरी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आल्याने त्यांनी येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये प्रकाशचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांच्या मार्गदर्शन खाली कांदळकर हे करीत आहेत.