…तर कोलकात्यातल्या डॉक्टरसारखी अवस्था करीन, 16 वर्षीय तरुणाची महिला डॉक्टरला धमकी

पार्किंगवरून 16 वर्षीय तरुण आणि महिला डॉक्टरमध्ये वाद झाला. तेव्हा या तरुणाने महिला डॉक्टरला कोलकात्या झालेल्या महिलेसारखी अवस्था करीन अशी धमकी दिली आहे. इतकंच नाही तर या तरुणाने महिला नातेवाईकांना बोलावून या महिलेला मारहाणही केली आहे. मुंबईतल्या मानखुर्दमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मानखुर्दच्या साठेनगरमध्ये या महिला डॉक्टरचा दवाखाना आहे. शनिवारी दुपारी साडे बारा वाजता डॉक्टर दवाखाना उघडायला आल्या. पण दवाखान्यासमोर कुणीतरी स्कूटी पार्क करून ठेवली होती. त्यामुळे दवाखान्याचे शटर उघडता येत नव्हते. डॉक्टरने कशीबशी स्कूटी हटवली आणि दवाखाना उघडला. काही वेळाना एक 16 वर्षांचा मुलगा तिथे आला आणि ही स्कूटी दुसरीकडे कोणी हलवली अशी डॉक्टरकडे विचारणा केली. तेव्हा डॉक्टरने आपणच स्कूटी हलवल्याचे सांगितले. तेव्हा या तरुणाने डॉक्टरला शिवीगाळ केली. डॉक्टरने रागाच्या भरात तरुणाच्या कानशिलात लगावली.

काही वेळानंतर हा तरुण तीन महिलांसोबत आला. त्यांनी डॉक्टरला मारहाण केली. इतकंच नाही तर या तरुणाने महिला डॉक्टरला धमकी दिली की कोलकात्यात काय झालं माहितीये ना, तशीच तुझीही अवस्था करेन असे म्हणाला. महिला डॉक्टरने या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली आहे.