दारुला पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन मुलांच्या गँगने पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. पुण्यातील हडपसर परिसरात शुक्रवारी मध्यराञी ही घटना घडली. राजू शिवशरण असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच मुलांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यराञी 1.30 वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथील वंदे मातरम चौकात आरोपींनी शिवशरणकडे दारूसाठी पैसे मागितले. माञ शिवशरणने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपींना राग आला. याच रागातून आरोपींनी त्याच्यावर काचेच्या बाटल्या आणि सिमेंटच्या तुकड्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात शिवशरण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शिवशरण याच्या पुतण्याच्या फिर्यादीवरुन वानवडी पोलीस ठाण्यात सात अल्पवयीन मुलांवर कलम 103 (1), 118 (1), 115 (2), 126 (2), 189 (1), 189 (2), 191 (2), 190 आणि 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.