
सामना प्रतिनिधी । पूर्णा
परभणी येथील सुधारगृहातून आरती बावरी हिची जामिनावर सुटका झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील देगलूरपासून जवळच असलेल्या तेलंगाणा राज्याच्या हद्दीतील कंदरपाणी या गावी तिला नातेवाईकांकडे ठेवण्यात आले होते. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तीन महिन्यापूर्वी प्रेम प्रकरणातून परळी येथून आपल्या प्रियकरासह पलायन केलेल्या व या प्रेमप्रकरणातून यापूर्वी प्रियकर अजय भोसले व मध्यस्थी करणार्या पांडुरंग गायकवाड या दोघांच्या खूनाच्या घटना घडल्यानंतर याच प्रकरणाने पुन्हा तिसरा बळी घेतला आहे. या प्रेम प्रकरणातील प्रेयसी असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने ४ एप्रिल रोजी एका गावात आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे प्रकरणाचा गुंता आणखीच वाढला असून या संपूर्ण प्रकरणात दोन्ही कुटूंबे उद्धवस्त झाली आहेत.
परळी येथील श्यामप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाखाली रेल्वे पटरी नजीक शिकलकरी समाजाची वस्ती आहे. एक महिन्यापूर्वी अजय अशोक भोसले व त्याची प्रेयसी आरती लग्न करण्याच्या उद्देशाने परळीतून गायब झाल्यानंतर ३ मार्च रोजी अजय याच्या नातलगांनी अपहरणाची फिर्याद दाखल केली होती. याचदरम्यान त्या मुलीच्या नातलगानीही बिचकुंदा (तेलगांणा राज्य) पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यानच्या काळात अजय याच्या खूनाचा पूर्णा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर याच प्रकरणाच्या अनुषंगाने परळीतील माजी नगरसेवक पांडूरंग गायकवाड याने २४ मार्च रोजीच्या मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर परळीतील शिकलकरी समाजात असुरक्षितता पसरुन अनेक कुटूंबांनी परळी सोडली होती. या घटनेच्या अगोदर पूर्णा पोलीसांनी सदरील मुलगी व तिच्या आईस चौकशीसाठी बोलवून अटक केली. व मुलगी आरती ही अल्पवयीन असल्याने तिला बालसुधार गृहात पाठविले. यानंतर ३ एप्रिल रोजी आरतीचा भाऊ तुफानसिंग बावरी याने परभणी येथून सुधारगृहातून आरतीचा जामिन करून नांदेड जिल्ह्यातील देगलूर पासून जवळच असलेल्या तेलंगाणा राज्याच्या हद्दीतील कंदरपाणी या गावी आपल्या नातलगांकडे ठेवले. आरती हिच्या मनावर प्रचंड दबाव होता. आपल्या कुटूंबाची आपल्यामुळे वाताहत झाली असून कुटूंबातील इतर सदस्यांना त्रास होत असल्याचे तिच्या मनावर दडपण होते. या दडपणातच आरतीने ४ एप्रिल रोजी बिचकुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपल्या नातलगाच्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. बिचकुंदा येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर आरतीच्या पार्थीवावर परळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रेम प्रकरणामुळे आतापर्यंत तिघांचा बळी गेला असून मागील कित्येक वर्षापासून गुण्या गोविंदाने राहत असलेल्या बावरी व भोसले कुटूंबियामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज भितीपोटी शिकलगार समाजातील अनेक कुटूंबानी परळी सोडलेली असून या समाजात प्रचंड दहशत पसरली आहे.




























































