
उघड्यावर शौचाला बसले म्हणून एका 12 वर्षाच्या मुलीची व 10 वर्षाच्या मुलाची बेदम मारहाण करत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी गावात ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी हाकीम यादव व रामेश्वर यादव यांना अटक केली आहे. हत्या झालेली मुलं ही दलित समाजाची होती, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मुलांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
दोन्ही मुलं मंगळवारी सकाळी पंचायत भवनच्या मागील भागात उघड्यावर शौचाला बसली होती. त्यावेळी हाकीम यादव व रामेश्वर यादव तेथून जात होते. त्यांनी आधी मुलांचे त्यांच्या मोबाईलवर फोटो काढले व त्यानंतर मुलांना काठीने बदडले. त्यांच्या मारहाणीमुळे दोन्ही मुलं जबर जखमी झाली होती. काही जणांनी मध्यस्थी करून मुलांना सोडवलं. त्यानंतर मुलांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी हाकीम यादव व रामेश्वर यादव दोघांनाही अटक केली आहे.
























































