
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईची रेल्वे वाहतूक आणि खोळंबा हे सध्या अतूट समीकरण बनलं आहे. बऱ्याचदा या खोळंब्याचं कारण अपघात असल्याचं सांगितलं जातं. पण, अपघातांपेक्षाही काही नतद्रष्टांमुळे मध्य रेल्वेच्या जवळपास 3 हजार फेऱ्यांचा खोळंबा आणि 400 हून अधिक लोकल ट्रेन रद्द झाल्याचं उघड झालं आहे. या नतद्रष्टांपैकी रेल्वे ट्रॅकच्या स्विचिंग पॉईंटवर दगड ठेवून जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचंही समोर आलं आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या सहा महिन्यांत रेल्वेच्या 400 गाड्या रद्द झाल्या. त्यातील 186 गाड्या या पॉईंट फेल्युअर या कारणासाठी रद्द करण्यात आल्या. पॉईट फेल्युअर म्हणजे गाडीच्या रूळ बदलण्याच्या ठिकाणी तांत्रिक बिघाड होणं. अशा घटना वारंवार घडू लागल्याने मध्य रेल्वेने याच्या कारणाचा शोध घेतला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. गाडीचे रूळ बदलण्याच्या स्विचिंग पॉईंटवर दगड ठेवल्याने मार्गात अडथळे निर्माण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. स्विचिंग पॉईंटवर ठेवण्यात येणारे दगड मुद्दामहून ठेवण्यात आल्याचंही समोर आलं आहे. स्विचिंग पॉईंटच्या मध्ये अडथळा आल्यानंतर गाडी आपला रूळ बदलू शकत नाही. परिणामी इतर गाड्यांना अपेक्षित असलेला मार्ग मोकळा न झाल्याने खोळंबा होतो.
नव्या प्रकारेच एल आकाराचे स्विचिंग पॉईंट्स बसवूनही हा प्रश्न न सुटल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्रास देण्याच्या हेतुने काही नतद्रष्ट रेल्वे रुळांवर दगड ठेवतात. काही वेळा दगडांऐवजी प्रवाशांनी बेशिस्तपणे टाकलेला कचराही स्विचिंग पॉईंटमधला एक प्रमुख अडथळा बनत असल्याचंही त्यांच्या निरीक्षणात आढळलं आहे. अशा प्रकारची प्रवृत्ती ही फक्त रेल्वेची डोकेदुखी ठरत नसून प्रवाशांचा अमूल्य वेळही वाया घालवत असल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


























































