San Rechal – मिस वर्ल्ड ‘ब्लॅक ब्यूटी’ सॅन रेचेलनं उचललं टोकाचं पाऊल, आर्थिक तंगीमुळं जीवन संपवलं

प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर सॅन रेचेल (वय – 25) हिने आत्महत्या केली केली. पुद्दुचेरी येथे वडिलांच्या राहत्या घरी तिने झोपेच्या गोळ्या घेत जीवन संपवले. प्राथमिक तपासानुसार, आर्थिक तंगी आणि मानसिक तणाव यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सॅन रेचेल ही आर्थिक तंगीत होती. त्यामुळे तिने झोपेच्या गोळ्यांचे अति सेवन केले. याबाबत कळताच तिला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला जवाहर मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

सॅन रेचेल उर्फ शंकर प्रिया हिने रंगाचा कोणताही कमीपणा न बाळगता मॉडेलिंगच्या जगतात ठसा उमटवला होता. पुद्दुचेरीच्या करमनी कुप्पम येथे राहणाऱ्या सॅन हिला किडनीचा त्रास होता असेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपले दागिनेही विकले होते. त्यामुळे तिचे वडील तिला आर्थिक सहाय्य करत होते. मात्र आता तिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून पोलिसांना एक सुसाईट नोटही सापडली आहे. यात तिने माझ्या मृत्युला कुणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.

सॅन रेचेल हिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. मिस पुद्दुचेरी (2020-2021), मिस डार्क क्वीन तामिळनाडू (2019) आणि मिस वर्ल्डमध्ये ब्लॅक ब्यूटी श्रेणीत तिने पदक जिंकले होते. तिने फॅशन शो, जाहिरातींमध्येही काम केले होते.

पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅचेल हिने 5 जून रोजी रक्तदाबाच्या 50 गोळ्यांचे सेवन केले होते. त्यानंतर तिला जेआयपीएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच तिने लग्न केले होते. तसेच तपासात असेही समोर आले की, फॅशन कार्यक्रमासाठी तिने कर्ज घेतले होते आणि यामुळे ती आर्थिक तंगीत होती. यामुळे मानसिक तणावातून तिने मृत्युला कवटाळले. या प्रकरणी उरुलायनपेट पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.