धावत्या रेल्वेतून रहस्यमयरीत्या गायब झालेली महिला वकील 12 दिवसांनी सापडली, MP मधून UP मध्ये कशी पोहोचली अर्चना तिवारी?

मध्यप्रदेशमधून धावत्या रेल्वेतून गायब झालेली महिला वकील अर्चना तिवारी हिचा अखेर 12 दिवसांनी शोध लागला आहे. भोपाळ पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे पथक तिला घेऊन भोपाळकडे रवाना झाले असून मध्यप्रदेश मधून गायब झालेली अर्चना नेपाळ सीमेजवळ पोहोचली कशी याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूर उच्च न्यायालयामध्ये महिला वकील असलेली 29 वर्षीय अर्चना तिवारी 7-8 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनासाठी इंदूरहून कटनीला निघाली होती. मात्र ती कटनीला पोहोचलीच नाही आणि धावत्या रेल्वेतून मधूनच गायब झाली. गेल्या बारा दिवसांपासून तिचा शोध सुरू होता. अखेर नेपाळ सीमेजवळील लखीमपूर खीरी शहरातून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रेल्वे पोलीस आणि भोपाळ पोलीस अर्चना तिवारी हिचा गेल्या दोन आठवड्यांपासून शोध घेत होते. आता ती सुरक्षित सापडली असून पोलीस तिचा जबाब नोंदवून घेत आहेत. यानंतर तिच्या गायब होण्यामागील रहस्य उलघडण्याची शक्यता आहे, असे रेल्वे पोलीस राहुल कुमार लोढा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

अर्चना तिवारी (वय – 29) मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात वकील म्हणून कार्यरत होती. ती सिव्हिल जज परीक्षेची तयारी करत होती. रक्षाबंधनासाठी ती नर्मदा एक्सप्रेसने इंदूरहून कटनीकडे रवाना निघाली होती. मात्र या प्रवासातच ती गायब झाली. तिच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन इटारसी स्टेशन दाखवत होते. त्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला. अर्चना कटनीला पोहोचलीच नाही हे कळतात कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार भोपाळच्या राणी कमलापती जीआरपी ठाण्यात दाखल केली होती.

12 दिवसांनंतर लागला शोध

तक्रार दाखल होताच पोलीस कामाला लागले. अर्चना हिचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी इटारसी आणि कटनीपर्यंत शोधमोहीम चालवली. शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर पोलिसांच्या प्रयत्नाला यश आले आणि 12 दिवसानंतर अर्चना चा शोध लागला. लखीमपूर खीरी येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.