
मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र घेणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कठीण काम असेच चित्र पाहायला मिळत आहे. अर्ज केल्यानंतर आठ ते दहा दिवसांत पदवी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे; परंतु विद्यार्थ्यांनी चार-पाच वेळा कालिना कॅम्पसमध्ये हेलपाटे मारल्यानंतर एक ते दोन महिन्यांत पदवी प्रमाणपत्र हातात पडते. मात्र हे प्रमाणपत्र सदोष असेल याची गॅरंटी नाही. मोठय़ा प्रयत्नानंतर मिळणाऱ्या पदवी प्रमाणपत्रात काही चुका असल्यास पुन्हा विद्यापीठात हेलपाटे मारण्याची पाळी विद्यार्थ्यांवर ओढवत आहे.
अनेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळत नाही. काही विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र गहाळ होते, तर काहींच्या नावात चुका असतात. अशावेळी विद्यार्थी परीक्षा विभागाकडे शुल्क भरून प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करतात. वास्तविक, अर्ज केल्यानंतर आठ-दहा दिवसांत पदवी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. परंतु विद्यापीठात चार-पाच वेळा हेलपाटे मारल्यानंतर दोन महिन्यांत प्रमाणपत्र मिळत आहे. या दिरंगाईविषयी युवासेना सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे लेखी तक्रार केली, पण काहीच सुधारणा झालेली नाही. पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकरी गमवावी लागली आहे, तर अनेकांना पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास विलंब झाला. विद्यापीठाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगावी, असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला.
नाव दुरुस्त करून आलेल्या प्रमाणपत्रात पुन्हा चुका
प्रीतम पांडुरंग भांदुगरे या विद्यार्थ्याने पदवी प्रमाणपत्रावरील नावात दुरुस्ती करण्यासाठी 29 मार्च रोजी विद्यापीठाकडे अर्ज केला. या विद्यार्थ्याने तीन ते चार वेळा कळवा ते कालिना कॅम्पसमध्ये प्रमाणपत्रासाठी फेऱया मारल्या. त्यानंतर 5 मे रोजी त्याला पदवी प्रमाणपत्र मिळाले, परंतु कर्मचाऱयांच्या निष्काळजीपणामुळे प्रितमच्या नावात पुन्हा चूक झाली. अशा चुका टाळण्यासाठी विद्यापीठाने स्वतःची छपाई यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. सध्या पदवी प्रमाणपत्राची छपाई कर्नाटकातून करण्यात येते. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीरही होतो तसेच विद्यार्थ्यांच्या नावात चुकादेखील असतात.

























































