
कर्णधार मिचेल मार्शच्या (85) झंझावाती फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा सहा विकेटनी धुव्वा उडवत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडचे 182 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 21 चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केले. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रव्हिस हेड यांनी दमदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात मॅट हेन्रीने ट्रव्हिस हेडला झेलबाद करून न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर दुसरे यश 12 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर काइल जेमिसनने मिळवले. त्याने मॅथ्यू शॉर्टला पायचीत केले. 15 व्या षटकात मॅट हेन्रीने शतकाकडे वाटचाल करणाऱ्या मिचेल मार्शला झेलबाद केले. पण त्या आधीच मार्शने 5 षटकार आणि 9 चौकारांची बरसात करत ऑस्ट्रेलियाचा सहज विजय निश्चित केला होता. मार्शची फटकेबाजी इतकी तुफानी होती की, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना काहीही करता आले नाही. शेवटी ऑस्ट्रेलियाने 17 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला न्यूझीलंडची स्थिती नाजूक झाली होती. अवघ्या 6 धावांवर 3 गडी बाद झाले. बेन ड्वारशुईसने डेव्हन कॉन्वे (1) आणि मार्क चॅपमन (0) यांना बाद केले. जॉश हेझलवूडने टिम सीफर्टचा (4) अडथळा दूर केला. अशा बिकट परिस्थितीत टिम रॉबिन्सन आणि डॅरिल मिचेल यांनी चौथ्या विकेटसाठी 92 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. पुढे रॉबिन्सनने बेवन जेकब्ससह (20) 64 धावांची भागी रचत संघाच्या डावाला दीडशतकापार नेले. मात्र रॉबिन्सनने शेवटपर्यंत लढा देऊनही त्यांचा संघ द्विशतकी आकडा ओलांडू शकला नाही. त्याने 66 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 106 धावा केल्या.


























































