Mitchell Starc Announces Retirement – टी-20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वेगाचा बादशाह मिचेल स्टार्कची निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज आणि वेगाचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मिचेल स्टार्कने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कसोटी आणि वन डे क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी त्याने झटपट क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2026 मध्ये हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये तो दिसणार नाही. स्टार्कच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

मिचेल स्टार्क 2021 मध्ये अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. टी-20 वर्ल्डकप 2024 मध्येही त्याने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. हा वर्ल्डकप झाल्यापासून त्याने ऑस्ट्रेलियासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही आणि आता त्याने थेट निवृत्तीची घोषणा केली आहे. कसोटी, वन डे आणि जगभरातील टी-20 लीग खेळण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ आगामी आयपीएल हंगामातही तो फलंदाजांच्या बत्त्या गुल करताना दिसेल.

काय म्हणाला स्टार्क?

निवृत्ती घोषणा करताना स्टार्क म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच प्राधान्य राहिलेले आहे. ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या प्रत्येक टी-20 सामन्याचाही मी आनंद घेतला, विशेषत: 2021 च्या वर्ल्डकपमध्ये. अर्थात आम्ही विजेतेपद पटकावले म्हणून नाही तर आमचा संघ सर्वच पातळीवर सर्वोत्तम होता आणि त्या काळात खेळताना खूप मजा आली.’

का घेतला हा निर्णय?

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. हिंदुस्थानचा कसोटी दौरा, इंग्लंडविरुद्ध एशेस मालिका आणि त्यानंतर 2027 चा वन डे वर्ल्डकप. या सर्व मोठ्या स्पर्धांसाठी फीट राहण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी हा निर्णय मला योग्य वाटतो. त्यामुळे आमच्या गोलंदाजी युनिटलाही टी-20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल, असेही स्टार्क म्हणाला.

टी-20 कारकीर्द

मिचेल स्टार्क याने 2012 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून 65 सामने खेळले असून 23.81 च्या सरासरीने एकूण 79 विकेट्स घेतल्या आहेत. फिरकीपटू एडम झम्पा (130 विकेट्स) याच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून टी-20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा स्टार्क दुसरा गोलंदाज आहे.