
उदय जोशी । बीड
शिवसेनेमध्ये जाती-पातीला थारा नाही. शिवसेनेत जात पाहिली जात नाही. काम आणि गुणवत्तेला प्राधान्य, काम करणाऱ्या माणसाची कदर शिवसेनेमध्ये होते. शब्द पाळले जातात, विश्वास टाकला जातो, शांत, संयमी, सुसंस्कृत आणि व्हिजन असणारे नेतृत्व शिवसेनेकडे आहे. मी शिवसेनेमध्ये आल्यापासून मोकळा श्वास घेतोय अशा भावना राष्ट्रवादीशी काडीमोड करून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी ‘दै.सामना’शी बोलताना व्यक्त केल्या.
शिवसेनेमध्ये चर्चेची देवाण घेवाण होते. कोणताही आडपडदा न ठेवता विचार मांडता येतात. विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व शिवसेनेकडे आहे. आज मी खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतोय, यापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी जबाबदारी आपल्यावर सोपवतील ती ताकदीने उचलण्यास मी तयार आहे, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुका झाल्या, मोठं यश महायुतीच्या पदरात पडले. पक्षातील धोरण आणि वागणूक त्या पक्षाच्या वाताहतीला कारणीभूत असते हे आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवातून पाहतो. लोकांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला. महायुतीच्या पारड्यात भरभरून मताचे दान टाकले. आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा आत्मविश्वासाने मैदानात उतरत आहेत. एक विचार, एक साखळी, एक आडाखे, यशाचा मार्ग दाखवण्यासाठी पुरेसे असतात. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या फरकाने शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन होणार यात तिळमात्र शंका नाही, असे क्षीरसागर आत्मविश्वासाने म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी मनभेद पाळत नाही. मन मोकळे ठेवून वागत असतो. कधी जाणिवपूर्वक कुणालाही दुखवले नाही. माणसे जोडणे हा माझा छंद आहे. नवे-जुने एकत्र घेवून संपर्क प्रस्थापित करणार आहे. पक्षबांधणीचे काम आता सुरू केले जाणार आहे. मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष आणि दुष्काळ याबाबत बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यासह मराठवाड्याचा दुष्काळ गहण विषय आहे. जायकवाडीच्या पाण्यावर मराठवाड्याला अवलंबून राहावे लागत आहे. दमणगंगा आणि नारपार हे पाणी समुद्राला जावून मिळते. ते उचलून जायकवाडीत आणि सिंदफणेच्या खोऱ्यामध्ये टाकता येऊ शकते. तसेच उजनीतील अतिरिक्त पाणी कृष्णा आणि मांजराच्या खोऱ्यामध्ये देता येवू शकते हे दोन मुद्दे अतिशय महत्वाचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी याबाबतचा उल्लेख केला आहे. दोन्हीही योजना अवघड असल्या तरी करायची ठरवलं तर शक्य होवू शकते असा विश्वास जयदत्त क्षीरसागरांनी व्यक्त केला. मराठवाड्यात वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, हाताला काम, उद्योग, शेतीमालाला रास्त भाव हे महत्वाचे विषय आहेत. आगामी काळामध्ये युतीचे सरकार या विषयाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित.

































































