
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (59) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. बाणेर येथील खासगी रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे.
वर्षभरापासून आमदार लक्ष्मण जगताप कर्करोगाने आजारी होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पार्थिवावर पिंपळे-गुरव येथील मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
लक्ष्मण जगताप हे 1986 ते 2007 या कालावधीत महापालिकेत नगरसेवक म्हणून सातत्याने निवडून आले. 1994-95 दरम्यान त्यांनी स्थायी समिती सभापतिपद तर, 2002 मध्ये महापौरपद भूषविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या जगताप यांनी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 2004ची विधान परिषद निवडणूक अपक्ष लढविली आणि जिंकली. पहिल्यांदाच ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातही ते 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 मध्ये शेतकरी कामगार पक्ष, मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला.
राष्ट्रकादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पकार यांचे कट्टर समर्थक असलेल्या जगताप यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 आणि 2019 मध्ये ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. भाजप शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. 2017च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यातील महापालिका खेचून भाजपचा झेंडा फडकविण्यात जगताप यांचा मोलाचा वाटा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.



























































