
भाजपमध्ये महिलांचा सन्मान राखला जात नाही. त्यांच्यावर वारंवार अन्यायच केला जातो. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडून त्यांचे पंख छाटले जातात, अशी सणसणीत चपराक भाजपच्या बेलापुरातील आमदार मंदा म्हात्रे यांनी लगावून भाजपला घरचा आहेर दिला.
वाशी येथे शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी हा गौप्यस्फोट केला. मी दोन वेळा निवडून आले असलो तरी आपल्याला भाजपमध्ये मानाचे स्थान मिळाले नाही. भाजपमध्ये महिलांवर अन्यायच केला जात आहे. या अन्यायाविरोधात मी वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रार केली. मात्र त्यांनी माझ्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही, अशी खंतही म्हात्रे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.
स्वकर्तृत्वावर निवडून आले
2014 साली झालेल्या निवडणुकीत मी निवडून आले तेव्हा मोदी लाटेत निवडून आले असा अपप्रचार करण्यात आला. 2019 लाही मी जिंकले. या दोन्ही निवडणुकीत मी मोदी लाटेत नाही, तर स्वकर्तृत्वावर निवडून आले, असेही म्हात्रे म्हणाल्या.






























































