सांताक्रुझ मेट्रो स्थानकाच्या दुर्दशेचा शिवसेनेकडून समाचार, आमदार वरुण सरदेसाईंनी केली पाहणी, अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आदेश

भुयारी मेट्रो मार्गावरील सांताक्रुझ (पूर्व) मेट्रो स्थानक व लगतच्या परिसराच्या दुर्दशेकडे वांद्रे-पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे उपअभियंता नीलेश पानगव्हाने यांचे लक्ष वेधले. स्थानकाबाहेरील अपूर्णावस्थेत असलेले जोडरस्ते तसेच लगतचे अर्धवट काम तत्काळ पूर्ण कराण्याचे आदेश आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रशासनाला दिले.

सांताक्रुझ मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर तेथील साहित्य सोडून देण्यात आल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत आमदार वरुण सरदेसाई यांनी मेट्रो प्रशासनाला जाब विचारला आणि अर्धवट राहिलेले संरक्षक कठडे, रस्त्यांना जोडणारे पादचारी मार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत आदेश दिले. तसेच मेट्रो स्थानकास जोडणाऱया रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून ते रस्ते वाहतुकीस खुले करण्याचेही आदेश मेट्रो प्रशासनाला दिले. मेट्रो स्थानकाबाहेर एमएमआरडीएच्या अखत्यारीत असणाऱया व पश्चिम द्रुतगती महामार्गावर नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाचे काम तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अधिकारी लोकरे यांना देण्यात आल्या. यावेळी शाखाप्रमुख संतोष गुप्ता, उपशाखाप्रमुख संजय परब, संतोष धावडे, गटप्रमुख असिफ शेख, प्रतीक्षा मोरे, चांद भाई, अशोक गुप्ता, मयूर जैन आदी शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.