
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) आयुक्तपदी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती झाली आहे. तर वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण विभागात बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आज आठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारल्यानंतर एमएमआरडीएच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता होती. सरकारने अखेर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यावर एमएमआरडीएची जबाबदारी सोपवली आहे.
‘बेस्ट’ लोकेश चंद्रांकडे
सुरेंद्र बागडे यांची केंद्रात नियुक्ती झाल्यापासून बेस्टचे महाव्यवस्थापक पद रिक्त होते. या रिक्त पदावर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव लोकेश चंद्रा यांची नेमणूक झाली आहे. सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक बी.वेणुगोपाल रेड्डी यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत भांगे यांची बदली सामान्य प्रशासन विभागाच्या (सामाजिक विशेष सहाय्य आणि विशेष चौकशी अधिकारी 2) सचिव पदावर झाली आहे.
पंतप्रधान कार्यलयात काम केलेले श्रीकर परदेशी हे परदेशातील प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांची बदली मुंबईत सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तर गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची मंत्रालयात इतर मागासवर्गीय विभागात उपसचिवपदी नेमणूक झाली आहे.
























































