इडली विक्रेत्याची मुजोरी; मराठीबद्दल अपशब्द, मनसेने दिला चोप

कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाची ठिणगी पडली आहे. रॉयल स्टार इडलीवाला या हॉटेलच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय इडली विक्रेत्याला मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याने मारहाण केली. कल्याण पूर्वेतील दुर्गा माता मंदिर परिसरात ही घटना घडली.

मराठी माणसांबाबत अपशब्द वापरल्याचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसेनेचे कल्याण पूर्व येथल पदाधिकारी अंकुश राजपूत आणि इतर कार्यकर्ते संतापले. त्यांनी तत्काळ हॉटेलवर धडक देत इडली विक्रेत्याला चोप दिला. चोप बसल्यानंतर इडली विक्रेत्याने सार्वजनिकरीत्या हात जोडून माफी मागितली. या प्रकारामुळे कल्याणमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असताना काही मराठीद्वेष्टे मुद्दामहून वाद घालत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.