भरपूर वाचा… मोबाईलवर!

>>प्रतिनिधी

मराठी कथा, कादंबऱ्या, कविता वाचण्यासाठी आणि नवलेखकांना हक्काचे व्यासपीठ प्रतिलिपी अॅपच्या रूपाने मिळाले आहे.

दैनंदिन  जगण्यात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तिला जोडणाऱ्या… ऋणात बांधून ठेवणाऱ्या… आयुष्याला नवे वळण देणाऱ्या आठवणी अनुभव प्रत्येकाकडेच असतात मात्र त्या व्यक्त करता येतातच असं नाही. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यामागे एक कथा लपलेली असते… ही कथा बोलकी होण्यासाठी… तिला न्याय देण्यासाठी… इतरांनाही त्या कथेतून बोध घेता यावा यासाठी ‘प्रतिलिपी’ या ऑनलाइन अॅपद्वारे एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.

वाचक आणि लेखकांना जोडणारे हे अॅप हिंदी, मराठी, मल्याळम, बंगाली, तमीळ, तेलगू, गुजराती आणि कन्नड अशा चक्क आठ भाषांतील साहित्याचा आनंद घेता येतो. कविता, पुस्तके, कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, प्रेमकथा, लोकप्रिय कथा, स्त्र्ााr विशेष कथा, वाचकांची पसंती असलेल्या कथा, विचार मंथन, नवीन प्रकाशित साहित्य असा पुरेपूर वाचनानंद या ऍपद्वारे घेता येईल. शिवाय वाचक येथे आपले मतही व्यक्त करू शकतात.

ऑनलाइन स्पर्धांचा खजिना

‘प्रतिलिपी’तर्फे लेखकांना लेखनासाठी आमंत्रित करण्यात येते. त्याकरिता भय, रहस्य, थरारक कथास्पर्धा, ‘काव्यधारा’ ही ऑनलाइन कविता स्पर्धा, ‘लेटरबॉक्स’ पत्रलेखन स्पर्धा, सिनेमा, शॉट फिल्म्स, डॉक्युड्रामा, चित्रपटातील संवाद, दृश्ये, गाणी, सिनेमातील पात्र आणि त्याची भविष्यातील कथा, फॅन-फिक्शन या विषयाशी निगडीत ‘सिनेरंग-प्रभाव सिनेमाचा’, व्यक्तीच्या गतकाळातील आठवणींच्या हिंदोळ्यांना उजाळा देण्यासाठी ‘गत आठवणींचा उजाळा’, ‘दिवाळी अंक लेखन’, ‘ऑनलाइन लघुकथा उत्सव’, सजीव, निर्जीव, गरीब, श्रीमंत या सर्व लेबलांपलीकडे असणारी ‘बंध मैत्रीचे’, वाचकांचे हृदय हेलावणाऱ्या ‘भयकथा’, काव्यप्रतिभेचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी ‘सूर काव्याचे’, सांस्कृतिक-वैचारिक देवाणघेवाण वाढावी, लोकांना इतर भाषेतील साहित्याचा आस्वाद घेता यावा याकरिता ‘ट्रान्सलेशन चॅलेंज प्रकल्प’, सृजनशीलतेला वाव देण्यासाठी ट्विस्टेड कथांसाठी ‘द्वंद्व-दोन पात्रांचे’, चित्रातून शब्दात व्यक्त होता यावे ‘चित्र बोलते काही’ असा अनोख्या ऑनलाइन स्पर्धांचा खजिनाच प्रतिलिपी सादर करते.

अॅपची वैशिष्टय़े

> हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर हजारो कथा, कविता, कादंबरी वाचायला मिळते.

> लेखक म्हणूनही यामध्ये सहभागी होता येते. त्यामुळे नव्या लेखकांना येथे संधी आहे.

> प्रतिलिपीवर लिहिणाऱ्या 7 हजारांपेक्षाही जास्त साहित्यकारांच्या कथा वाचायला मिळतात.

> प्रेमकथा, भयकथा, रहस्यकथा, बोधकथा, लघुकथा, हास्य कथा, कादंबरी, लेख, जीवनचरित्र, प्रवासवर्णन, समाज प्रबोधनात्मक लेख, पाककला अनुभव, भविष्य, ऐतिहासिक असे अनेकविध साहित्य वाचता येते.

> छोटय़ा वाचकांसाठी ‘चमचमणारी छोटीशी दुनिया’ या सदराद्वारे अनेक गोष्टी यामध्ये आहेत.

> वाचलेल्या कथा व्हॉटस्ऍप, ट्विटर, ई-मेलद्वारे इतरांना शेअरही करता येते.

छोटय़ा वाचकांसाठी

छोटय़ा वाचकांच्या अवतीभोवतीच्या जगाशी संबंधित कथा ‘रिटेल, रिमिक्स आणि रिजॉय’ या बालकथा स्पर्धेत वाचण्याची आणि लिहिण्याची संधी मिळते. माझे कुटुंब-पालक, भावंडे, काका-काकू, आजी-आजोबा, माझे घर, रोज वेळ कसा घालवतो?, माझे खाणे, पाळीव प्राणी, रानटी प्राणी, किडे, पक्षी अशा मुलांना रमवणाऱ्या गोष्टी लिहिण्याची स्पर्धाही येथे आयोजित केली जाते.