
>> शैलेश माळोदे
मोबाईल, टॅब, संगणक या साऱयांचा आत्मा बॅटरी. या लिथियन बॅटरीने खऱया अर्थाने आपल्या आयुष्यात रंग भरले. पाहूया तिच्या जन्माची चित्तरकथा.
दिवाळीमध्ये आपल्या मोबाईलद्वारे आपण अगदी सहज कुणाशीही बोलू शकतो, व्हॉट्सऍप करू शकतो आणि चॅट रंगवू शकतो, परंतु यंदाच्या दिवाळीच्या अनुषंगाने ‘गप्पा वैज्ञानिकांशी’ या सदरात आज केवळ एकाच व्यक्तीशी गप्पा नसून अनेक शास्त्रज्ञांशी आपण साधलेला माझ्यामार्फतचा संवाद आहे. निमित्त आहे 2019 सालचं रसायनशास्त्र नोबल पारितोषिक. हे पारितोषिक आपणा सर्वांना ठाऊक आहे की लिथियम आयन बॅटरीजद्वारे संपूर्ण ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सचं जगच बदलून टाकणाऱया शास्त्रज्ञ त्रयींना देण्यात आलंय. हे तीन शास्त्रज्ञ म्हणजे 97 वर्षांचे प्रा. जॉन गुडइनफ, 77 वर्षीय एम. स्टॅनली व्हिटिंगहॅम आणि 72 वर्षांचे प्रा. मार्करा योशिनो. त्यांच्या संशोधनामुळे संपूर्ण पोर्टेबल तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडून आलीय आणि आपला मोबाईल या क्रांतीचा एक अग्रदूत आहे.
97 वर्षीय प्रा. जॉन गुडइनफ हे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे सर्वात वयोवृद्ध वैज्ञानिक ठरले असून ते अजूनही दररोज आपल्या प्रयोगशाळेत जाऊन संशोधन करतात. लिथियम आयन बॅटरीजची चर्चा या पारितोषिकासाठी फार पूर्वीपासून होत असे. रॉयल स्वीडिश अकादमी फॉर सायन्सेसनं हे पारितोषिक जाहीर करताना म्हटलंय की, ‘या तिघांनी वायरलेस, अश्मीभून खनिज इंधनविरहित समाज आणि मानवजातीसाठी सर्वात मोठा फायदा करून देण्याच्या दृष्टीनं पाया घातलाय.’’ हे पारितोषिक प्राप्त झाल्यावर कसं वाटतंय? असा प्रश्न विचारल्यावर ई-मेल मुलखाद्वारे सहज सोपी उत्तर मनमोकळेपणे प्राप्त झाली. प्रा. योशिनो यांनी सहज उत्तर दिलं, ‘अमेझिंग, सरप्राईझिग’. प्रा. गुडइनफ यांनी यापूर्वीच्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं की, त्यांना त्यांच्या कार्याचा नक्की प्रभाव ध्यानात आला नाही. ते म्हणाले, ‘जेव्हा आम्ही बॅटरी विकसित केली तेव्हा केवळ काहीतरी नवं चांगलं करायचं होतं. मला ठाऊक नव्हतं की, विद्युत अभियंते या बॅटरीचं काय करतील. मला खरोखरच सेलफोन्स, कॅमकॉर्डर्स आणि इतर सगळय़ा गोष्टींविषयी काहीच अंदाज नव्हता.’
गुडइनफ यांना या नोबेल पारितोषिकाच्या घोषणेबाबत काही ठाऊक नव्हतं. त्यांना ते त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञ प्रा. मारिया हेमेन ब्रॅगा यांनी ते झोपले असताना उठवून सांगितलं. 20 वेळेला सेलफोनवर याविषयी बातमी दाखविल्यावर त्यांचा विश्वास बसला. नंतर ते म्हणाले, ‘नोबेल त्यांच्या ध्यानीमनीदेखील नव्हतं, परंतु त्यांना ते मिळाल्याबद्दल आनंद आहे.’ विनोदानं ते पुढे म्हणाले, ‘या वयात पारितोषिकानं काही फरक पडत नसतो.’
ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात असलेले प्रा. गुडइनफ यांनी पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीला जन्म घालणारा शोध लावूनदेखील गडगंज पैसा न मिळविल्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही ते अजूनही प्रयोगशाळेत काम करतात. ते म्हणाले, ‘मी पैशांची पर्वा वा चिंता करत नाही. मी जेव्हा प्रत्येक गोष्ट केली त्याचा फायदा फक्त वकिलांना झाला. त्यांनी खूप पैसा मिळवला.’ या बॅटरी तंत्रज्ञानामुळे भविष्यात इलेक्ट्रिक कार्स बनवणं सोपं होईल अशी आशा व्यक्त करून ते म्हणाले, ‘खनिज इंधनावरील आपल्या अवलंबित्वातून सुटका करून घेण्यासाठी आपण काहीतरी मार्ग शोधायला हवा.’प्रा. गुडइनफ यांच्याविषयी विचारल्यावर रॉयल सोसायटीचे अध्यक्ष आणि 2009 चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त मूळ हिंदुस्थानी शास्त्रज्ञ वेंकी रामकृष्णन म्हणाले, ‘प्रा. गुडइनफ यांचं पदार्थ विज्ञान (मटेरियल सायन्स) क्षेत्रातलं योगदान इतकं मौलिक आहे की, त्यानं आज आपण गृहीत धरत असलेल्या तंत्रज्ञानास विकसित केलं. आपल्या खिशातील स्मार्टफोनला पॉवर करण्यापासून ते त्यांच्या चुंबकत्वाविषयी असलेल्या संशोधनाने विज्ञान संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रात नवीन दालनं खुली केली. ‘प्रा. गुडइनफ यांना कॉप्ली मेडल रॉयल सोसायटीकडून प्रदान करण्यात आल्याच्या दिवशी त्यांची एक छोटी मुलाखत ध्वनिमुद्रित करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी सध्या सुरू असलेल्या आपल्या संशोधनाविषयी आणि तंत्रज्ञानाच्या वापराविषयीचे आपले विचार प्रकट केले. ही मुलाखत मी नव्हे तर नोबेल पारितोषिकाच्या माध्यम कक्षाद्वारे घेण्यात आली. यात प्रा. गुडइनफ म्हणतात, ‘मी यशस्वी ठरलोय कारण मी लवकर निवृत्त झालो नाही (संशोधनातून). सध्या आम्ही एका पॉलिमरविषयी संशोधन करतोय. त्यात अगदी न प्रवाहित होणारा द्रव पदार्थ असतो, त्याद्वारे लिथियम आणि सोडियम द्रवाप्रमाणे वेगात वाहून नेता येतं. याबाबत आम्ही काम करतोय. तंत्रज्ञानाविषयी बोलायचं झाल्यास लोक तंत्रज्ञान वापरणारच, परंतु ते कसं वापरतात हे अधिक महत्त्वाचं आहे.
1991 साली लिथियम आयन बॅटरीज बाजारात उपलब्ध झाल्या. त्याला अद्याप पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान बऱयापैकी बस्तान मांडून आहे. ‘गुडइनफ लाफ्स’ असं गुगल केल्यावर कळतं, ते इतक्या खुल्या रितीने मोकळं हसतात की, त्यांचं हसणं अनेक खोल्या ओलांडूनही दूरवर ऐकता येतं. हेच त्यांचं हास्य कामाप्रति असलेली पॅशन त्यांना 97 वर्षांचं होऊनही नित्यनूतन, चिरतरुण ठेवतं, नाही का?



























































