मुंबईत उपलब्ध होणार आता मोबाईल शवपेट्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महापालिकेच्या माध्यमातून आता मुंबईत फिरत्या शवपेट्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे अंत्यविधी लांबल्याने तासन्तास मृतदेह घरात राहिल्याने निर्माण होणारा आजार आणि दुर्गंधीचा धोका टळणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत आरोग्य समितीच्या पटलावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबईत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वेळा अंत्यविधीसाठी अनेक तासांचा कालावधी लागतो. रात्री होणारा मृत्यू किंवा दूरवरून येणाऱ्या नातेवाईकांमुळे दहा तासांपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. मात्र पाच ते सहा तासांतच मृतदेहाच्या विघटनाला सुरुवात होते. त्यामुळे आजार-दुर्गंधीचा धोका निर्माण होतो. अशा वेळी अनेक वेळा शवपेट्या खासगी संस्थेकडून भाड्याने घेतल्या जातात. मात्र यासाठी गोरगरीबांना तासाला हजारो रुपये मोजावे लागतात. पालिका रुग्णालयांतील शवागृहांमध्ये मोफत मृतदेह ठेवण्याची व्यवस्था असली तरी रुग्णालयांपासून दूर आणि घरी मृत्यू होणाच्या प्रकारांमध्ये यावर मर्यादा येतात.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिकेच्या माध्यमातून प्रत्येक विभाग कार्यालयाकडून फिरत्या शीत शवपेट्या (मोबाईल मॉर्ग) मोफत पुरवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. याला पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

विशेष धोरण ठरवणार
पालिकेने प्रत्येक परिमंडळनिहाय एक अशा सात शीत शवपेट्या खरेदी करण्यास सकारात्मकता दर्शवली असली तरी याबाबत आरोग्य समितीमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी मसुदा तयार करण्यास सुचवले आहे. फिरत्या शवपेटीची देखभाल-दुरुस्ती कशी होणार, अनामत रक्कम, प्रत्येक शीतपेटीसाठी येणारा खर्च, पालिकेकडून मंजूर झाल्यास शवपेट्यांच्या खरेदीसाठी प्रमुख अभियंता, यांत्रिकी व विद्युत विभागाकडून निविदा काढण्यास प्रस्ताव सादर करता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.