पुण्यात दुचाकीस्वार मोबाईलचोरांचा हैदोस; बिबवेवाडी, वानवडी, हडपसर परिसरातून मोबाईल हिसकाविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी हैदोस घातला आहे. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना विचारपूस करण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकाविले जात आहेत. त्यामुळे महिला, पादचारी, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याशिवाय हद्दीतील बीट मार्शल आणि पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. टेम्पो चालक तरूणासह दोन महिलांच्या हातातील मोबाईल हिसकाविण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टेम्पो चालविणाऱ्या तरूणाला अडवून तुझे वय आहे, हे वय काय वाहन चालवायचे आहे, असे विचारत दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याचा 15 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना 31 ऑगस्टला दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील शेळके वस्तीपरिसरात घडली. याप्रकरणी तरूणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एपीआय राजेश उसगावकर तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील 10 हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना 22 ऑगस्टला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील दत्त मंदीर कॉर्नर परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव तपास करीत आहेत.

नातेवाईकाकडे जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील 5 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना 24 ऑगस्टला संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकाजवळ घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उमेश कदम तपास करीत आहेत. दरम्यान, मोबाइल हिसकाविण्याच्या घटनांमुळे महिलांनी चिंता व्यक्त केली आहे. बहुतांश घटनांमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येत आहे.