
सामना ऑनलाईन । हडपसर
गेली अनेक दिवस पुणे शहर व हडपसर उपनगरात मोबाईल चोरट्याने धुमाकूळ घातलेला आहे. पोलिसांना गुंगारा देऊन व नागरिकांच्या खिशातील मोबाईल सराईतपणे चोरणार्या एका सराईत चोरट्याला हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने अटक केली. त्याच्या कडून ४१ मोबाईल जप्त केले असून तब्बल सात लाख रुपये किंमतीचा घरफोडी व मोबाईल चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.
रामटेकडी जवळ राहणार्या २० वर्षीय अझहर यासीन पठाण असे चोरट्याचे नाव आहे. त्याने हडपसर परिसरातून मोबाईल दुकानात घरफोडी करून पाच मोबाईल व पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. गेली अनेक दिवस हा चोर हडपसर परिसरातील एका खाद्य पदार्थ घरपोच सेवा देणाऱ्या कंपनी मध्ये कामाला होता. भाजी मंडई, बस स्टॉप अशा ठिकाणी बेसावध असलेल्या नागरिकांना हेरून नकळत मोबाईल चोरी करत होता. पोलीस तपासात त्याच्याकडून घरफोडी व मोबाईल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
हडपसर गांधी चौक परिसरात एक तरूण मोबाईल विक्रीसाठी येणार आहे. अशी माहिती तपास पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील पिशवी मध्ये १० मोबाईल असल्याचे आढळले. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून ३१ मोबाईल जप्त केलेले आहेत.
पोलिसांनी आरोपीस घरफोडी व मोबाईल चोरी प्रकरणी अटक करून लष्कर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



























































