
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात पावसाळ्याच्या तोंडावर शुक्रवारी आणीबाणीच्या परिस्थितीत करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांची रंगीत तालीमच घेण्यात आली. मध्य रेल्वेची मुंबई डिव्हिजनची आरपीएफ आणि जीआरपीची टीम, पुण्याची एनडीआरएफची टीम यांच्या संपूर्ण 141 जणांच्या टीमने दादर रेल्वे स्थानकात आणीबाणीच्या परिस्थितीत कसे काम करायचे याची प्रात्यक्षिके सादर केली.
सर्वात जास्त गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात 29 सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरपीएफ आणि महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड यांच्या जवानांची संख्या वाढविण्यात आली. पुण्याच्या एनडीआरएफच्या सहकार्याने मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी 3.50 ते 4.20 असा अर्धा तास दादर रेल्वे स्थानकात मॉकड्रील घेण्यात आली. सर्व टीमनी त्यांच्या प्रवाशांचा बचाव करण्यासंदर्भात साहित्यानिशी या प्रात्यक्षिकांत सहभाग घेतला. घटनास्थळावर पहिला प्रतिसाद देणारा रेल्वे सुरक्षा दलाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून विचार होत असतो याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मेडिकल फर्स्ट रिस्पॉण्डर्सची भूमिका यावेळी विशद करण्यात आली. मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अश्रफ यांच्या मार्गदर्शनानंतर हे डिझास्टर मॅनेजमेंट मॉकड्रील संपुष्टात आले.
आरपीएफ आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे 75 जवान, जीआरपीचे 33 जवान, रेल्वेच्या कमर्शियल शाखा, वैद्यकीय शाखा आणि एनडीआरएफच्या 33 जवानांनी अशा 141 जणांच्या टीमने सहभाग घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

























































