
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास ही रंगीत तालीम ( मॉक ड्रील ) करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रंगीत तालीम पार पाडण्यात आली. दुपारी चार वाजता रत्नागिरी तहसील कार्यालयावर बॉम्ब पडल्याचा संदेश पोलीस आणि आपत्ती नियंत्रण कक्षाला देण्यात आला. तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरुन धुराचे लोट बाहेर पडले. त्याचवेळी सायरन वाजला आणि त्याचवेळी एनसीसी पथक, पोलीस दल, शीघ्रकृती दल जवान, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपदा मित्र, नागरी संरक्षण दल, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात जखमी झालेल्यांना नेण्यासाठी तात्काळ रुग्णवाहिका धावत आल्या. जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. अशाप्रकारची रंगीत तालीम पार पडली.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात, रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या आवारात, राजापूर शहरामध्ये, दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत आणि संगमेश्वर येथील हातीव ग्रामपंचायत या ठिकाणी ही रंगीत तालीम पार पडली. तसेच जेएसडब्ल्यू पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट, अल्ट्राटेक कंपनी या चार प्रमुख कंपन्यांमध्येही ही रंगीत तालीम करण्यात आली. या रंगीत तालमीच्या वेळी आरोग्य यंत्रणा, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका, प्रथमोपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले की, केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करून आजचे मॉकड्रिल यशस्वी करण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये वेगाने नागरीकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मॉकड्रिलमध्ये कोणतीही अफवा न पसरवता ते यशस्वी पार पाडल्याचे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट सांगितले की, मॉकड्रिलमध्ये काही त्रुटी असतील तर त्यावर निश्चितपणे सुधारणा केल्या जातील. तसेच सहभागी झालेल्या सर्व विभागांचे त्यांनी आभार मानले.