
>> स्नेहा चव्हाण
आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहे. या यशाच्या मागे असलेली आरोग्य, अर्थभान आणि कुटुंब ही सक्षमतेची त्रिसूत्री तिला वेगळी ओळख देणारी ठरते.
स्त्रीम्हणजे फक्त एक व्यक्ती नाही; ती आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मैत्रीण आहे आणि समाजाची दिशा ठरवणारी शक्ती आहे. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहे. पण या यशाचा मजबूत पाया तीन महत्त्वाच्या गोष्टींवर उभा आहे – फिटनेस (आरोग्य), फायनान्स (आर्थिक स्वावलंबन) आणि फॅमिली (कुटुंब).
फिटनेस – निरोगी शरीर, सक्षम मन
आरोग्य हेच खरे धन असे आपण नेहमी म्हणतो. स्त्री निरोगी असेल तरच ती कुटुंब आणि समाजासाठी सक्षमपणे उभी राहू शकते.आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला स्वतच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. घर, नोकरी, जबाबदाऱ्या सांभाळताना त्या स्वतसाठी वेळ काढत नाहीत. पण रोज थोडा व्यायाम, योग, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आता गरजेचे आहे. रोजच्या छोटय़ा सवयींनी मोठा बदल घडतो. उदाहरण द्यायचे झाले तर मेरी कोम. त्यांनी आपल्या फिटनेसची काळजी घेतली आणि जगात भारताचे नाव उंचावले. यावरून स्पष्ट होते की, स्त्रीने स्वतच्या आरोग्याला प्राधान्य दिले तर ती कोणतीही उंची गाठू शकते. म्हणून प्रत्येक महिलेने स्वतसाठी दररोज थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे. कारण निरोगी स्त्री म्हणजे निरोगी कुटुंब. आरोग्य हेच खरे धन आहे. स्वतची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणारी स्त्रीच दीर्घकाळ यशस्वी राहू शकते. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधु, साक्षी मलिक, दिपा कर्माकर ही अशीच नावं ज्यांनी शिस्तबद्ध जीवनशैली, मेहनत, कठोर सराव आणि फिटनेसच्या जोरावर जागतिक स्तरावर यश मिळविले. या सर्व महिलांनी सिद्ध केले की, फिटनेस ही यशाची पहिली पायरी आहे.
फायनान्स – आर्थिक स्वावलंबन म्हणजे आत्मसन्मान
आर्थिक स्वातंत्र्य हे स्त्रीच्या आत्मविश्वासाचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. आजची स्त्री शिक्षण, नोकरी, व्यवसाय या क्षेत्रांत पुढे जात आहे. पण केवळ कमाई करणेच नव्हे, तर बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन यांचे ज्ञान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.आर्थिक स्वातंत्र्यामुळे स्त्री आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकते आणि स्वतच्या पायावर उभी राहू शकते. घरातील स्त्री आर्थिकदृष्टय़ा सक्षम असेल, तर ती कुटुंबासाठी योग्य निर्णय घेऊ शकते, संकटांना सामोरे जाऊ शकते आणि पुढील पिढीला योग्य दिशा देऊ शकते. आर्थिक साक्षरता ही आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी आवश्यक आहे. नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर, बायोकॉनच्या किरण मुझूमदार – शॉ, एचसीएल टेक्नॉलॉजीच्या वंदना लुथ्रा या यशस्वी महिलांनी दाखवून दिले की, आर्थिक स्वावलंबन म्हणजे आत्मसन्मान आणि सामर्थ्य आहे, स्त्रीच्या स्वावलंबनाची खरी ताकद आहे.
फॅमिली – कुटुंब हीच खरी ताकद
स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. तिच्या प्रेमामुळे, संयमामुळे आणि समजुतीमुळे घर एकत्र राहते. पण कुटुंब सांभाळताना स्वतची ओळख हरवू नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुधा मूर्ती या उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी कुटुंब, समाजकार्य आणि व्यावसायिक आयुष्य यांचा सुंदर समतोल राखला आहे. यावरून आपण शिकतो की, स्त्रीने कुटुंबाची जबाबदारी निभावताना स्वतची स्वप्नेही पूर्ण केली पाहिजेत. कुटुंब हेच स्त्रीचे बळ आहे, स्त्री ही कुटुंबाची शक्ती आहे. ती कुटुंब आणि करिअर यांचा सुंदर समतोल राखते. कुटुंब आणि समाजकार्य यांचा उत्तम समतोल साधत यशस्वी करिअरसोबत कुटुंबालाही प्राधान्य देणाऱ्या या महिला म्हणूनच यशस्वी ठरल्या आहेत.
या सर्व उदाहरणांतून स्पष्ट होते की, स्त्री कुटुंबाची शक्ती आहे आणि कुटुंब तिचे बळ आहे. प्रेम, आधार आणि संस्कार – सशक्त स्त्रीचा खरा अभिमान. कुटुंबासोबत घालवलेला वेळच आयुष्याची खरी संपत्ती. म्हणूनच येणार्या महिला दिनानिमित्त आपण एक वचन देऊया –
आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनूया आणि कुटुंबासोबत प्रेम व विश्वास मजबूत नाते जपूया.
स्त्री अबला नाही, ती सबला आहे.
ती कमकुवत नाही, ती शक्ती आहे.
ती फक्त घर सांभाळणारी नाही, तर भविष्य घडवणारी आहे. स्वतवर विश्वास ठेवूया, स्वतला घडवूया आणि समाजाला नवी दिशा देऊया.
(लेखिका श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी येथे समुपदेशिका आहेत.)



























































