
सामना ऑनलाईन, नागपूर
पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी हे सुरुवातीची दोन वर्षे अधूनमधून मला फोन करायचे. कधी कधी बोलावूनही घ्यायचे; पण आता ते माझा सल्ला घेत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले. मोदी यांनी यापूर्वी शरद पवार हे आपले मार्गदर्शक आणि सल्लागार आहेत, असे जाहीर सभांमधून सांगितले होते. त्यामुळे पवारांची चांगलीच अडचण झाली होती.
पवार हे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनासाठी गोंदिया येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी माझा सल्ला आता घेत नाहीत. माझ्या सल्ल्याचे सोडा, ते त्यांच्या मंत्र्यांचे आणि पक्षाच्या खासदारांचेसुद्धा काहीएक ऐकत नाहीत. मोदी सरकारला देशातील जनता आता पुरती कंटाळली आहे. भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यास जनता लोकसभा निवडणुकीची वाटच पाहत आहे. त्यामुळे आता सत्तांतर घडणे अटळ आहे, असे पवार म्हणाले.
पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली
लोकशाहीत पंतप्रधान पद हे उच्च स्तरावरचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकाही पंतप्रधानाने आजवर त्या पदाची अप्रतिष्ठा होईल अशी वक्तव्ये कधी केली नाहीत असे सांगून पवार म्हणाले की, मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. त्यांनी महिलांवर आणि इतर नेत्यांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली आहे.





























































