
नरेंद्र मोदी बिहारमध्ये असे फिरत आहेत, जणू त्यांच्या मुलाचं लग्न आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. बिहारमधील राजा पाकर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत की, “पंचायत निवडणुकीपासून ते संसदीय निवडणुकांपर्यंत मोदीच सगळीकडे फिरत आहेत. त्यांचा चेहरा प्रत्येक वेळी दिसतो. मोदींचा चेहरा पाहून लोक किती वेळा मतदान करतील?”
यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “आज देशभरात दलितांना धमकावले जात आहे. मोदी आणि नितीश कुमार यांना दलितांची काहीच पर्वा नाही. त्यांना फक्त त्यांच्या पदांची काळजी आहे. समाजवादी विचारसरणीबद्दल बोलणारे नितीश कुमार दलित, मागासवर्गीय आणि अति मागासवर्गीयांना विसरून भाजपशी हातमिळवणी केली.”
ते म्हणाले, “आज नितीश कुमार मनुस्मृतीवर विश्वास ठेवणाऱ्या, महिलांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि दुर्बल घटकांना दडपणाऱ्या भाजपसोबत उभं आहे. म्हणूनच आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.”



























































