पाणी, वीज, बेड, टॉयलेट, मोदींची ध्यानधारणेसाठीची गुहा आहे हायटेक

54

सामना प्रतिनिधी । डेहराडून

अखेरच्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर रात्रभर येथील गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली. आता गुहेत मोदींनी ध्यानधारणा केलेली ही गुंफा चांगलीच हायटेक आहे. येथे पाणी, वीज, बेड, टॉयलेट इतकेच नाही तर टेलिफोनचीही व्यवस्था आहे.

ही गुहा खास मोदींसाठी तयार करण्यात आली आहे. समुद्रसपाटीपासून 12 हजार फूट उंचीवर असलेली ही गुहा एक भलामोठा दगड कापून तयार करण्यात आली आहे. या गुहेला जोडूनच एक शौचालय, एक खिडकीही आहे. या खिडकीतून केदारनाथ मंदिराचे विलोभनीय रूप पाहायला मिळते. ही गुहा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रुंद आहे. या गुहेचे बांधकाम एप्रिलमध्ये करण्यात आले. एकूण साडेआठ लाख रुपये खर्च करून ही गुहा तयार करण्यात आली असून ‘रुद्र’ असे या गुहेचे नामकरण करण्यात आले.  

999 रुपये देऊन करा ध्यानधारणा

नेहरू पर्वतारोहण संस्थेने या गुहेची निर्मिती केली आहे. केदारनाथमध्ये या गुहेप्रमाणे आणखी पाच गुहांची निर्मिती करण्यात येणार आहे. कुणीही तीन दिवसांसाठी या गुहेचे बुकिंग करू शकतो. गरजेनुसार बुकिंगचा कालावधी वाढवता येऊ शकतो. गढवाल विकास महामंडळाकडे बुकिंग करावे लागेल. केवळ 999 रुपये देऊन एक दिवसासाठी बुकिंग करता येईल. दरम्यान, गुहेचे बुकिंग केल्यानंतर सर्वप्रथम संबंधित व्यक्तीची आरोग्य चाचणीही करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या