मोदींनी दिल्लीत निवडणूक जाहीर करावी, आप नेते अरविंद केजरीवाल यांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपचे राष्ट्रीय संयोजक यांनी दिल्ली अबकारी प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. माझ्याविरोधात कट रचण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. “इतकं सगळं करूनही तुम्ही मला थांबवू शकलात नाही,” असे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले, “तुम्ही आमच्यावर किती तरी खटले दाखल केले. ईडी, सीबीआय, पोलीस आणि आयकर विभाग आमच्यामागे लावले. आमचे पाच मोठे नेते तुरुंगात पाठवले.” ते पुढे म्हणाले, “केजरीवालला थांबवायचं असेल तर त्याला संपवणं हाच एकमेव मार्ग उरला होता, कारण इतर कोणतीही गोष्ट मला तोडू शकली नाही. तुम्ही सगळे प्रयत्न केले.”

ते म्हणाले की आणखी एक मार्ग आहे, पण तो पंतप्रधान करू शकत नाहीत. “मी दिल्लीमध्ये 500 शाळा उभारल्या; तुम्ही देशभरात 5,000 शाळा उभारा. मी दिल्लीतील रस्ते सुधारले; तुम्ही संपूर्ण देशातील रस्ते दुरुस्त करा. मग कोणी केजरीवालबद्दल विचारणारही नाही. पण ते मोदीजी करू शकत नाहीत,” असा दावा त्यांनी केला.

अबकारी प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की चार वर्षांपासून ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तथाकथित दारू घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. सीबीआय आणि ईडीने आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाला प्राथमिकदृष्ट्या खटला चालवण्यासाठी पुरेसा पुरावा आहे का, हे ठरवायचे होते. अद्याप खटला सुरूही झाला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुमारे 600 पानी आदेशात न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे निवेदन विचारात घेतल्यानंतर खटला चालवण्यासाठी आवश्यक असा कणभरही पुरावा नाही, तसेच विश्वासार्ह साक्षीदार नाहीत, असे नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. “एकही असा पुरावा नाही ज्याच्या आधारे खटला चालवता येईल,” असे न्यायालयाने म्हटल्याचा दावा त्यांनी केला. हा आदेश ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले आणि “हा कट कोणी रचला आणि का रचला? हा संपूर्ण कट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मिळून रचला,” असा आरोप त्यांनी केला.

केजरीवाल यांनी दिल्ली निवडणुकांबाबतही आव्हान दिले. “दिल्लीला अधोगतीकडे ढकलण्यात आले आहे. सत्तेच्या राजकारणाचा सर्वात मोठा फटका दिल्लीतील 3 कोटी जनतेला बसला आहे,” असे ते म्हणाले. “मोदीजींमध्ये हिंमत असेल तर दिल्लीमध्ये तातडीने निवडणुका जाहीर कराव्यात. त्यांच्या पक्षाला 10 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडेन,” असे आव्हान त्यांनी दिले.