
जन्मानंतर वर्षातच त्याला पोलिओ झाला, त्यात दोन्ही पाय निकामी झाले. केवळ आणि केवळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षण घेत एका दिव्यांग विद्यार्थ्याने आज वाणिज्य शाखेत पदव्युत्तर होत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. यापुढे स्पर्धा परीक्षांना तोंड देत आपणाला सरकारी नोकरी करायची आहे, असे त्याने ‘सामना’जवळ बोलताना सांगितले. मोहंमद तकसिम खान असे या जिद्दी विद्यार्थ्यांचे नांव आहे.
मूळ उत्तरप्रदेशमधील अरंज येथील तकसिम खान हे व्यवसायाच्या निमित्ताने 25 वर्षापूर्वी कोकणात आले. भंगार खरेदी करण्याचा व्यवसाय करणाऱ्या तकसिम यांना 1996 साली मुलगा झाला. या बातमीने त्यांच्या गावाकडेही आनंदोत्सव साजरा झाला. मात्र हा आनंद केवळ वर्षभरच टिकला. 1997 साली अचानक एक वर्षाच्या तान्हुल्या मोहंमदला पोलिओ झाला आणि त्याचे दोन्ही पाय निकामी झाले.
आता रडत राहून आयुष्य सरणार नाही या भावनेने तकसिम यांनी मोहंमद कंबरेपासून वरती चांगला आहे या आशेच्या जोरावर त्याची सर्व ती काळजी घेतली. अन्य मुलांप्रमाणे मोहंमदला त्यांनी पहिलीच्या वर्गात संगमेश्वर येथील केंद्रशाळेत दाखल केले. दोन्ही पाय पूर्णतः निकामी असतानाही पुढील शिक्षणाची ओढ आणि आगळ्या वेगळ्या जिद्दीचा संदेश घेऊन तो पैसाफंड हायस्कूल संगमेश्वर येथे दाखल झाला. दहावीच्या वर्गात पोहचल्यानंतर त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून या परीक्षेत चक्क 60 टक्के गुण प्राप्त करीत सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवली.
दहावीनंतर शिक्षण न थांबवता त्याने याच शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. अकरावीच वर्ष थोड निवांत असतं म्हणून शांत न राहता मोहम्मदने एम.एस.सी.आय.टी. चा संगणक कोर्स यशस्वीपणे पुर्ण केला. याच कालावधीत त्याने मराठी आणि इंग्रजी टायपिंग परीक्षा दिल्या व त्यातही उत्तम यश मिळवले. बारावीतही त्याने आपली सर्व जिद्द पणाला लावून अभ्यास करत 60 टक्के गुण मिळवले.
दोन्ही पायांना पोलिओ झालेल्या मोहम्मदला उभेही राहता येत नाही तरी पण तो क्रिकेट खेळतो. व्यायामासाठी घराजवळील मैदानात तो रोज सायंकाळी मित्रांसमवेत तासभर खेळतो. बारावीनंतर लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयात प्रवेश घेत त्याने पुढचे शिक्षण सुरू ठेवले. त्याने वाणिज्य शाखेत देखील प्रथम श्रेणीत पदवीधर होण्याचा मान मिळवला. आता स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी सेवेत दाखल होण्याची मोहम्मदची मनिषा आहे. याचबरोबर नोकरी करून आपल्या भावंडांसह अपंग मुलांना शिक्षणासाठी जमेल तेवढी मदत करणार असल्याचेही तो अभिमानाने सांगतो.



























































