हिंदू धर्मही नोंदणीकृत नाही! RSS च्या नोंदणीवरून सुरू असलेल्या वादावर मोहन भागवत यांचं विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणीवरून सध्या वाद सुरू आहे. राष्ट्रसेवेचा दावा करणारा संघ नोंदणीकृत संघटना का नाही? असा सवाल काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केला होता. एवढेच नाही तर सत्तेवर आल्यावर संघावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यावर आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करत हिंदू धर्मही नोंदणीकृत नसल्याचे म्हटले. बंगळुरूत आयोजित ‘100 वर्षांचा संघ – नवीन क्षितिजे’ या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू असण्याचा अर्थही सांगितला.

कायदेशीर बंधनातून वाचण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी करण्यात आली नाही का? असा सवाल मोहन भागवत यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, अनेक गोष्टी नोंदणीशिवाय अस्तित्वात असून हिंदू धर्मही नोंदणीकृत नाही. तसेच हा मुद्दा पहिल्यांदाच उपस्थित झालेला नाही. संघाची सुरुवात 1925 मध्ये झाली होती. त्यावेळी आम्ही ब्रिटिशांकडे नोंदणी करायला हवी होती अशी अपेक्षा आहे का? असा सवालही त्यांनी केला.

अनेक अनोंदणीकृत व्यक्ती, संस्थांनाही कायदेशीर दर्जा दिला जातो. आम्ही याच श्रेणीत मोडतो आणि संघ मान्यताप्राप्त संघटना आहे, असे सरसंघचालक म्हणाले. तसेच स्वातंत्र्यानंतरही सरकारने संघाला नोंदणी अनिवार्य करण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयकर विभागाने एकदा आम्हाला कर भरण्यास सांगितले होते. यावरही न्यायालयामध्ये खटला चालला होता. आम्ही व्यक्तींचा समूह असून आम्ही देणगी करमुक्त असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला होता, असेही भागवत म्हणाले. तसेच आमच्यावर तीनदा बंदी घालण्यात आली होती आणि प्रत्येक वेळी न्यायालयाने बंदी उठवली, असे म्हणत संघही वैध संघटना असल्याचे ते म्हणाले.