अनुसूचित जाती-जमातीची व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकते, मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरसंघचालकपदी नियुक्त होणारी व्यक्ती ब्राम्हणच असली पाहिजे अशी अट नाही, अनुसूचित जाती-जमातीची व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकते, फक्त ती हिंदू असावी आणि काम करणारी असावी, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिली.

वरळी येथे आयोजित ‘संघ प्रवासाची 100 वर्षे, नवे क्षितीज’ या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी संघ कार्य, विचार व अन्य मुद्दय़ांवर संघाची भूमिका मांडली. हिंदुस्थानात कुणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे पण सक्तीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर केले गेले असेल तर त्या नागरिकांची घरवापसी व्हायला हवी असे मत भागवत यांनी मांडले.

नागरिकांना रोजगार मिळायला हवा

सरसंघचालकांनी यावेळी देशातील रोजगाराच्या प्रश्नीही आपली भूमिका मांडली. देशातील नागरिकांना जगण्यासाठी रोजगार मिळायला हवा आणि ती काळजी सरकारने घेतली पाहिजे असे ते म्हणाले.

संघाचे कामकाज मातृभाषेतूनच चालणार

संघाचे कामकाज त्या-त्या भागातील मातृभाषा आणि हिंदी भाषेतूनच चालणार, इंग्रजी भाषेचा कामकाजात वापर कधीही होणार नाही, इंग्रजी फक्त आवश्यकतेनुसार संपका&साठी वापरली जाऊ शकते.

संघ सांगेल, तेव्हा पदावरून दूर होईन

वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीने कोणत्याही पदावर न राहता शरीर साथ देईपर्यंत कार्य करत रहावे, अशी संघाची भूमिका आहे. त्यामुळे संघ सांगेल तेव्हा पदावरून दूर होईन, असे भागवत यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न अजून का मिळाला नाही? नक्की विचारेन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. सावरकर यांना अद्याप भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात का आले नाही? असा प्रश्न यावेळी सरसंघचालक भागवत यांना विचारण्यात आला. त्यावर, पुरस्कार देणाऱ्या समितीमध्ये मी नाही, पण समितीमधील कुणी भेटले तर आपण यासंदर्भात नक्की विचारू असे भागवत म्हणाले.