मोखाड्यात 28 जणांना गॅस्ट्रोची लागण; बोरशेती गावात 24 तास आरोग्य पथक तैनात

मोखाड्यातील सायदे ग्रामपंचायत हद्दीतील बोरशेती गावातील नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दोन दिवसांपासून गॅस्ट्रोमुळे नागरिक बेजार असून आतापर्यंत २८ हून अधिक जणांवर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, मोखाडा ग्रामीण रुग्णालय आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित होऊन नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला असून गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी गावात २४ तास आरोग्य पथक तैनात केले आहे.

बोरशेती गावात गुरुवारी रात्रीनंतर नागरिकांना अचानक गॅस्ट्रोचा त्रास जाणवू लागला. गॅस्ट्रोने बेजार असलेल्या २० रुग्णांना ग्रामस्थांनी रात्रीच खासगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर दोन गंभीर रुग्णांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तातडीच्या उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने बोरशेती गावात एक पथक तैनात केले आहे.

परतीच्या पावसाचा फटका

आठवडाभरापासून मोखाड्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे गटार तसेच अन्य मार्गाने पावसाचे पाणी बोरशेती येथील विहिरीत मिसळले. परिणामी विहिरीचे पाणी दूषित होऊन नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाने गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. औषध, जंतुनाशक फवारणी केली जात आहे. ग्रामस्थांनी पाणी गाळून पिण्याचे आवाहन मोखाडा तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी केले आहे.

योग्य उपचाराचा अभाव

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री रुग्णांना दाखल केले. मात्र योग्य उपचारांअभावी रुग्णांचा त्रास कमी झाला नाही. अखेर सकाळनंतर आम्ही रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. येथे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नागरिकांचा सरकारी दवाखान्यावरचा विश्वास उडत असल्याची नाराजी ग्रामस्थ आत्या झुगरे यांनी व्यक्त केली.