
नेमबाजीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणाऱया प्रख्यात प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे (44) यांचे गुरुवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर काही वेळातच त्यांचीही प्राणज्योत मालवल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ञ भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली मोनाली यांनी नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवले. भारतीय युवा नेमबाज संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक, श्रीलंका संघाच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी नाशिकच्या मातीतील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. दशकाहून अधिक काळ त्या खेळाडूंना प्रशिक्षण देत होत्या. नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेतील माजी कर्मचारी मनोहर बापू गोऱ्हे हे त्यांचे वडील होत. त्यांचे पहाटे, तर अवघ्या काही तासांत सकाळी मुलीचेही निधन झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


























































