
मनीएज आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दोघा आरोपींना अटक केल्यानंतर तपासात समोर आल्याप्रमाणे या प्रकरणाशी संबंधित आठ सदनिका आणि कोकणातील चार ठिकाणच्या 16 एकर जमिनी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कोटय़वधींची ही संपत्ती असून त्यांची नेमकी किंमत समजू शकली नाही.
तीन हजार गुंतवणूकदारांची जवळपास 100 कोटींची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज विरोधातील तपासाचा फास आणखी आवळला आहे. या कंपनीचे दोन संचालक हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणे अशा दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांनी आता दुसरी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाशी संबंधित चार ठिकाणच्या मिळून 16 एकर जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत. श्रीवर्धन येथे पाच एकर, तर पाली येथील तीन ठिकाणच्या मिळून एकूण 11 एकर जमिनी आहेत. याशिवाय पोलिसांनी आठ ठिकाणच्या सदनिका जप्त केल्या आहेत. टिटवाळा, बदलापूर, विरार, दिवा या ठिकाणी या सदनिका असून त्या सर्व सदनिकांची किंमत अंदाजे चार कोटी रुपयेपर्यंत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. याशिवाय 17 बँक खात्यांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.
प्रिया प्रभू हिला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज्च्या संचालक व आरोपींपैकी एक असलेली प्रिया प्रभू हिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. वैद्यकीय कारण देत तिने अटकपूर्व जामिनाची मागणी केली. यावर 22 जानेवारीला न्यायालय सुनावणी करणार आहे. मात्र तोपर्यंत चौकशीसाठी तपास पथकाकडे दिवसातून दोन तासांसाठी हजर राहण्यास प्रिया प्रभू हिला न्यायालयाने सांगितल्याचे समजते. या प्रकरणातील चौथा संचालक व आरोपी राजीव जाधव हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.






























































