“मंकीगेट” प्रकरण हा  माझ्या कारकिर्दीतील “काळा” अध्याय, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॉन्टिंगची कबुली

1786

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने ‘मंकीगेट’ प्रकरण हे कर्णधार म्हणून आपल्यासाठी सर्वात खडतर काळ होता आणि हे प्रकरण आपल्या कारकिर्दीतील काळा अध्याय असल्याची कबुली दिली आहे. टीम इंडियाच्या 2007 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, हरभजनसिंगने ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमंड्सला माकड (monkey) म्हटल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हरभजनने  हे आरोप फेटाळले होते. या प्रकरणावर अखेरीस पॉंटिंगने आता आपले मौन सोडले  आहे.

“मन्कीगेट”  हा कर्णधार म्हणून माझ्यासाठी सर्वात खडतर काळ होता. 2005  साली आम्ही ऍशेस मालिका गमावली होती, मात्र त्यानंतरही मी पूर्ण नियंत्रणात होतो. पण मंकीगेट प्रकरणात जे झालं त्यावेळी माझा माझ्यावर ताबा राहिला नव्हता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो सर्वात खराब काळ होता, या प्रकरणाचे पडसाद नंतरही उमटत होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे , सुनावणीदरम्यान हजर राहणे  या गोष्टी मला अजुनही आठवतात.” आयसीसीच्या समितीसमोर झालेल्या सुनावणीत हरभजनसिंगला दोषी मानत 3 सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

डिवचलेल्या हिंदुस्थानने केले होते कांगारूंना पराभूत

कर्णधार रिकी पाँटींग, मॅथ्यू हेडन आणि मायकल क्लार्क यांनी सायमंड्सच्या बाजूने साक्ष दिली होती. मात्र या सर्व गोष्टींचा खेळावर परिणाम झाल्याचं पाँटीगने आता प्रांजळपणे कबूल केले आहे. . या प्रकरणानंतर आम्ही पर्थमध्ये कसोटी सामना खेळला, हा सामना जिंकण्यासाठी आम्ही दावेदार होतो, परंतु या सर्व गोष्टींमुळे आम्ही हा सामना गमावला, अशी खंत पॉंटिंगने व्यक्त केली. तो  स्काय स्पोर्ट्स  वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता. मंकीगेट प्रकरणानंतर झालेल्या पर्थ कसोटी सामन्यात हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियावर 72 धावांनी मात केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या