
येऊरमध्ये आणखी एका माकडाची शिकार केली असल्याची घटना आज समोर आली आहे. माकडाच्या पिलाच्या थेट मानेत टोकदार बाण मारला असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. या घटनेने खळबळ उडाली असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यजीवदेखील सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व्यक्त केला आहे.
ठाण्यातील निसर्गरम्य येऊरमध्ये एका माकडाला बाणाने मारले असल्याचे शुक्रवारी समोर आले. त्यापाठोपाठ आज सकाळी डोंगराच्या पायथ्याशी एका माकडाचे पिलू जखमी असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या पिलाच्या मानेतच कोणीतरी अज्ञातांनी टोकदार बाण मारला. काही दिवसांपूर्वी असाच एक गंभीर जखमी माकड सापडला असताना आज पुन्हा एक माकड बाणाची शिकार झाला असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मानेत बाण असलेला जखमी माकड उंच झाडाच्या फांदीवर असल्याने त्या माकडाला रात्री उशीरा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू केले. जखमी माकडावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.
मारेकऱ्यांचा शोध सुरू
माकडाची शिकार करणाऱ्या मारेकऱ्यांचा शोध वनविभागाने सुरू केला आहे. यासाठी वनविभागाने तीन पथक तयार केले आहेत. सीसीटीव्ही मार्फत शोध घेण्यात येत असून कोणीतरी तरबेज असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतलेल्या ‘बिट्टू बॉस’चा मृत्यू
येऊरमध्ये आईपासून ताटातूट झालेल्या बिबट्याच्या बछड्याचा शनिवारी रात्री दीर्घ आजाराने मृत्यू झाला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बछड्याला दत्तक घेतले होते. या बछड्याला ‘बिट्ट बॉस’ हे नाव देण्यात आले होते. ४ डिसेंबर २०१९ मध्ये बछडा सापडला होता. त्यानंतर त्याचे संगोपन पशुवैद्यकीय यांच्या देखरेखीखाली करण्यात येत होते. दरम्यान, काही महिन्यांपासून तो किडनीच्या विकाराने त्रस्त होता.



























































