
लोकल आणि मेट्रोनंतर मुंबईकरांना प्रवासाचा तिसरा मार्ग म्हणून मोनो रेल सुरू करण्यात आली. रोज हजारो प्रवासी मोनोने प्रवास करतात. पण काही केल्या या मोनो डार्लिंगमागचे ग्रहण काही सुटत नाही. चालू वर्षात तिचा आज दुसऱयांदा ब्रेकडाऊन झाला. वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने ती दोन स्थानकांदरम्यान अडकून पडली. मध्येच अडकल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. पाऊण तासानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने प्रवाशांना शिडीवरून खाली उतरवले गेले. परंतु शिडीवरून उतरताना प्रवाशांचे पाय थरथरत होते.
मोनो रेल आज सकाळी साडेदहाच्या सुमारास म्हैसूर कॉलनी आणि भारत पेट्रोलियम स्थानकादरम्यान मधेच वाशी नाका परिसराजवल थांबली. क्षणभर काय झाले हे प्रवाशांना कळलेच नाही. कुजबूज सुरू झाली. पण नंतर उद्घोषणा झाली की वीजपुरवठा खंडीत झाल्याने गाडी थांबली आहे. 38 प्रवासी त्यावेळी गाडीमध्ये होते. तांत्रिक बिघाड काही तातडीने दुरुस्त होण्यासारखा नसल्याने 10.46 वाजता अग्निशमन दलाशी संपर्क साधला गेला.
सवाअकरा वाजता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या गाडय़ा पाहून घटनास्थळी खाली रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. मोनोच्या खांबाजवळील तिसऱया डब्यामध्ये सर्व प्रवाशांना बोलवून तेथील आपत्कालीन दरवाजा उघडला गेला. तेथून नंतर सर्वांना अग्निशमन दलाच्या शिडीवरून खाली उतरवले गेले. शिडीवरून उतरताना प्रवसी भेदरले होते. महिला प्रवाशांचे तर पाय थरथरत होते. सुदैवाने कुणालाही इजा पोहोचली नाही. गाडीला वीजपुरवठा करणाऱया यंत्रणेत बिघाड झाल्याने मोनामध्येच अडकून पडल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सांगण्यात आले. तब्बल 11 तासांनंतर रात्री सव्वानऊच्या सुमारास मोनोची सेवा पूर्ववत झाल्याची माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.
दुसऱयांदा ब्रेकडाऊन
चालू वर्षातला ‘मोनो’चा हा दुसरा ब्रेकडाऊन होता. यापूर्वी 15 मार्चला मोनो रेल्वे अशाच प्रकारे म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकादरम्यान वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने अडकून पडली होती. त्यावेळीही गाडीच्या पायलटसह 10 प्रवाशांना अग्निशमन दलाच्या शिडीच्या सहाय्याने खाली उतरवले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेची गंभीर दखल घेत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते.


























































