
सामना प्रतिनिधी। मुंबई
येत्या शनिवारी पाऊस मुंबईसह महाराष्ट्रातून काढता पाय घेणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचा ट्रेलरच जणू पावसाने दाखवला. संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सोसाटय़ाचा वाराही घोंघावत होता. कुलाब्यापासून ते कुर्ला, सायन, माटुंगा, कांजुरमार्ग, मुलुंडपर्यंत तर पश्चिम उपनगरात कांदिवली, बोरिवलीपासून ते वसई, विरार, पालघरपर्यंत तसेच कोकणात पाऊस थोडासाच बरसला आणि चमकला.
राजस्थान आणि गुजरातमधून काढता पाय घेतल्यानंतर पाऊस महाराष्ट्रातूनही गायब होईल असे स्कायमेटने म्हटले आहे. तर हवामान विभागाने मात्र आणखी दोन दिवस पाऊस असाच जलवा दाखवेल आणि शनिवारपासून गायब होईल असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसभर कडक ऊन पडत असून अंगातून अक्षरशŠ घामाच्या धारा वाहत आहेत. पण,आज सकाळी हवामान ढगाळ दिसले. दमट हवामानामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. अशातच संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला.
-अरबी समुद्रात गुजरात समुद्रकिनाऱयाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मुंबई, कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दोन दिवस चमकणार पाऊस
पुढचे दोन दिवस मुंबईसह उपनगरात पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हा परतीचा पाऊस असल्यामुळे जोरदार ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असल्याचे स्कायमेटच्या महेश पलावत यांनी सांगितले. हा परतीचा पाऊस असला तरीही तो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात महाराष्ट्रातून गायब होईल असेही त्यांनी सांगितले.


























































