
पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवल्यास या संकटाचा मुकाबला करण्यासाठी 400 गावे सज्ज झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणादेखील अलर्ट मोडवर असून गावागावांमध्ये जनजागृतीबरोबरच विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यात फर्स्ट एड बॉक्स, लाइफ जॅकेट, फोल्डिंग स्ट्रेचर यांसह अन्य 30 वस्तूंचा समावेश आहे. पुराशी लढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर्णपणे तयारी केली असून एनडीआरएफची टीमदेखील तैनात केली जाणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येतो तसेच दरडीही कोसळतात. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन ठप्प होते. घरे कोलमडतात, वादळी वारा आणि पावसासोबत मुकाबला करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर्षी अशा घटना घडल्यास संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जवानांना विशेष ट्रेनिंग दिले आहे. तसेच प्रत्येक गावात मदत जलदगतीने पोहोचवण्यासाठी सर्व विभागांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अशी आहे अत्याधुनिक किट
आपत्ती काळात उपयोगात येणाऱ्या किटमध्ये तरंगणारी प्रथमोपचार पेटी असून त्यात 30 वस्तूंचा समावेश आहे. सीपीआर मास्क, बँडेज, नेक बेल्ट, सेफ्टी गॉगल, टॉर्च शोध व बचाव दिवा, टूल किट, वेगवेगळे रोप, हेल्मेट, ग्लोज, लाइफ जॅकेट, गम बूट, तरंगणारे व फोल्ड होणारे स्ट्रेचर तसेच लाइफ जॅकेट यांचा समावेश आहे. या सर्व वस्तू आयएसआय मार्क असून त्या कशा हाताळायच्या याचेही प्रशिक्षण दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.