आज मान्सून मुंबईत; अनेक भागांत गडगडाटासह मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. हा मान्सूनपूर्व पाऊस होता असे सांगतानाच मान्सून उद्या, बुधवारी मुंबईत दाखल होत असल्याची माहिती हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह किनारपट्टी भागात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच आभाळ दाटून आले होते. त्यानंतर सकाळी गडगडाट सुरू झाला आणि मुसळधार पाऊस कोसळला. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने महानगरपालिका प्रशासनही सज्ज झाले आहे.  हवामान खात्याने गेल्या शनिवारीच मान्सून रत्नागिरीच्या हर्णे किनारपट्टी भागात पोहोचल्याचे जाहीर केले होते. परंतु हवामान बदलल्याने मान्सूनचा मुंबईच्या दिशेने वेग मंदावला. आज कुलाबा, महालक्ष्मी आणि दादर भागात 20 मि.मी. ते 40 मि.मी. तर उत्तर मुंबईतील चिंचोली, बोरीवली आणि दहिसर भागात दुपारपर्यंत 60 मि.मी. इतका पाऊस नोंदला गेला. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक आणि मराठवाडय़ातील काही भागांमध्ये जोरदार वाऱयांसह मुसळधार पाऊस झाला.