मुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय

757

सामना ऑनलाईन । मुंबई

कोणताही ऋतु आपल्या हटके पद्धतीने साजरा करण्यात अग्रेसर शहर कोणतं..? उत्तर आहे मुंबई. फॅशनचा प्रवाह सतत बदलता ठेवण्यासाठी मुंबईकरांना कोणतंही निमित्त पुरतं. आता तर जून महिन्यात पावसाळी खरेदी करण्यासाठी उधाण आलं आहे.

कोणत्याही ऋतुत स्वतःची फॅशन मिरवण्याचा ट्रेंड मुंबईकर आवर्जून पाळतात. त्यानुसार मग बाजारात तसे नवीन पर्याय उपलब्ध आहेत का याची शोधाशोध सुरू होते. आता मुंबईकरांनी मागितलं आणि बाजारात ते नाही, असं शक्य नाही. या परंपरेला अनुसरूनच यंदाही बाजारात नवनवीन गोष्टी दाखल झाल्या आहेत. पाऊस म्हटला की तीन वस्तुंची खरेदी हमखास होते. रेनकोट-छत्री, बॅग्ज आणि चपला. त्यातही रेनकोट-छत्री म्हणजे जीवाभावाचे दोस्त. त्यामुळे त्याची खरेदी मुंबईकर अगदी उत्साहाने करतात. त्यासाठी विविध मार्केटमध्ये फेऱ्या घालतात. यंदा वांद्र्याच्या लिंकींग रोडवर रेनकोट, छत्री आणि बॅग्जमध्ये रंगीबेरंगी पर्याय उपलब्ध झाले आहेत. अॅनिमल प्रिंट, योगा प्रिंट अशा काही हटके डिझाईनच्या छत्र्या सध्या इन आहेत. शिवाय विविध देशांच्या राष्ट्रध्वजांचे प्रिंट असलेल्या छत्र्याही उपलब्ध आहेत. रेनकोटमध्ये मात्र प्रिंटेडपेक्षा प्लेन रंगांना अधिक पसंती आहे. त्यातही काळा, तपकिरीसह पेस्टल आणि ब्राईट रंगांना विशेष पसंती मिळाल्याचं दिसत आहे.

red

मुंबईकरांची पुढची शॉपिंग म्हणजे बॅग्ज. पावसाळ्यात या बॅग्नमध्येही नवनवीन ट्रेंड बघायला मिळत आहेत. गेल्यावर्षी बॅगेसाठीची कव्हर्स बाजारात आली होती. यंदा त्या जोडीला वॉटरप्रुफ मटेरियलच्या बॅग्ज चांगल्याच लोकप्रिय होत आहेत. रबरी आवरणासारख्या पोताच्या कापडाने या बॅग्ज बनवलेल्या असल्याने पावसाचं पाणी बॅगेत जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ग्राहक त्यांना पसंती देत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. अर्थात या सर्व वस्तु ‘परवडेबल’ आहेत. फक्त गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात वस्तुंच्या किमती वाढल्या आहेत. रेनकोटची किंमत 400 रुपयांपासून सुरू असून बॅग्जची किंमत 450 पासून सुरू आहे. तर छत्र्यांची किंमत 350 रुपयांपासून सुरू आहे.baggggg
छत्री-रेनकोट आणि बॅग्ज झाल्या.. आता राहिल्या चपला. खरंतर दर्दी फॅशनिस्ट मुंबईकर असो किंवा पावसाळ्यातही आपली फॅशन न सोडणारा मुंबईकर. दोघंही तिन्ही ऋतुंमध्ये चपलांच्या फॅशन धुंडाळतातच. पावसात तर या फॅशनला उधाण येतं. यंदाही  पार्ल्याच्या इर्ला मार्केटमध्ये चपलांचे काही नवीन ट्रेंड आले आहेत. ज्यांना वारंवार ऋतुनुसार चपला बदलणं आवडत नाही त्यांच्यासाठी नेहमीच्या चपलांसारख्या दिसणाऱ्या पण पावसाळ्यासाठी विशेष सोल असलेल्या चपला बाजारात आल्या आहेत. सध्या फ्लिप फ्लॉप चपलांची फॅशन चांगलीच इन आहे. त्यामुळे पावसाळी पद्धतीच्या चपलांमध्येही फ्लिप फ्लॉप चपला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या किमतीही 300 ते 350 रुपयांमध्ये आहेत, तर पुरुषांच्या चपला 500 ते 590 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. चला तर मग तुम्ही कधी जाताय खरेदीला?

पाहा यंदाचे मान्सून फॅशनचे ट्रेंड्स

आपली प्रतिक्रिया द्या