मुरादाबादमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर महिलेचे धरणे आंदोलन, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. नानपूर गावात एका महिलेने भाजपच्या माजी मंडल अध्यक्षाच्या घरासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. संबंधित नेत्याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले आणि मंदिरात विवाह करूनही आता पत्नीचा दर्जा देण्यास नकार दिला आहे, असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे म्हणणे आहे की, भाजप नेत्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी संबंध ठेवले. वारंवार लग्नाचा तगादा लावल्यानंतर नेत्याने तिला एका मंदिरात नेऊन तिच्याशी विवाह केला. मात्र, लग्न होऊनही तो आता तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार नाही आणि तिला घरात प्रवेश देण्यासही मज्जाव केला जात आहे. आपला हक्क आणि पत्नीचा दर्जा मिळेपर्यंत तिथून हलणार नाही, अन्यथा तिथेच जीव देईन, असा पवित्रा महिलेने घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांची मोठी गर्दी जमा झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुंदरकी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले. टीव्ही 9 वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून रविवारी रात्री उशिरा दोन्ही पक्षांनी आपले जबाब नोंदवले आहेत. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुराव्यांच्या आधारे आणि नोंदवलेल्या जबाबांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.