एसी लोकलला आजपासून ‘परे’वर सात अतिरिक्त थांबे

39

सामना ऑनलाईन, मुंबई

पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या वातानुकूलित लोकलला आज गुरुवार 1 नोव्हेंबरपासून सात अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वातानुकूलित लोकल सध्या चचर्गट ते विरारदरम्यान धावत असून तिच्या आठवडय़ाच्या पाच दिवस दररोज 12 फेऱ्या होतात. या वातानुकूलित लोकलला मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि वसई रोडसारखे मोजकेच थांबे देण्यात येत होते. आता 1 नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या वेळापत्रकात एसी लोकल आता मरीन लाईन्स, चर्नीरोड, ग्रँट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा येथेही थांबा घेणार आहे.

दरवाजा उघडझाप होण्यास वेळ लागतो…
सध्या पश्चिम रेल्वेकडे एकच एसी लोकल असून तिच्या स्वयंचलित दरवाजांना उघडझाप होण्यास लागणाऱ्या वेळेमुळे या लोकलला प्रत्येक स्थानकावर साधारण लोकलपेक्षा जादा वेळ थांबा द्यावा लागत असल्याच्या मुद्दय़ाकडेही लक्ष दिले पाहिजे असे तज्ञांचे म्हणणे आहे. नव्या वेळापत्रकात पश्चिम रेल्वेवर दहा नव्या फेऱ्यांचा समावेश करण्यात आला असून 122 सेवांचा विस्तार करण्यात आला आहे, तसेच काही सेवांचा वेगही वाढविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या